पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) पुणे दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते मेट्रोच्या मार्गाचे उद्घाटन आणि भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे आणि छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक शहराचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय, भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रम एका व्यासपीठावर पार पडणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने राज्याचे अधिवेशन पुण्यात घेतले. त्यानंतर आता मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या 3.62 किमी अंतराच्या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन ते करणार आहेत. तसेच स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोच्या मार्गिकेचे भूमिपूजन करतील. त्यानंतर स. प. महिविद्यालयातील मैदानावर पंतप्रधान मोदी यांची जाहीरसभा होणार आहे.
गर्दीसाठी जबाबदारी
कार्यक्रमस्थळाच्या परिसरात पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. स. प. महाविद्यालय येथे गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.
भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजनही केले जाणार
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहेत. तसेच सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आणि छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन या औद्योगिक शहराचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.