
PMRDA, Pune Housing, Home Lottery,
PMRDA housing scheme lottery : पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ आणि ३०-३२ येथील बहुचर्चित गृहयोजनेसाठी यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये सदनिका न मिळालेल्या, परंतु प्रतीक्षा यादीत स्थान मिळवलेल्या ३३० पात्र लाभार्थ्यांना आता सदनिका वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. मूळ सोडतीमधील अनेक लाभार्थ्यांनी तांत्रिक कारणास्तव किंवा वैयक्तिक कारणांमुळे सदनिका नाकारल्यामुळे रिक्त राहिलेल्या या सदनिका आता प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना लॉटरीद्वारे जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची आशा पल्लवित झाली असून, त्यांना आता १८ जून २०२६ पर्यंत आपली निवड निश्चित करायची आहे.
पीएमआरडीएने ८ एप्रिल २०२६ रोजी एकूण १,०२९ सदनिकांची सोडत काढली होती. यात ८७१ लाभार्थी पात्र ठरले होते, तर ६५५ अर्जदारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले होते. मूळ सोडतीतील ८७१ लाभार्थ्यांपैकी केवळ ४०१ जणांनी सदनिका स्वीकारल्या. उर्वरित लाभार्थ्यांनी सदनिका रद्द केल्याने किंवा दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्याने मोठ्या प्रमाणात सदनिका रिक्त राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, पीएमआरडीएने ८ जून रोजी प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली आणि ३३० लाभार्थ्यांची निवड केली.