1072 किमीच्या पुणे ग्रँड-2 साठी रस्ते सज्ज होणार; सप्टेंबरनंतर खोदाईला नकार, जिल्हा प्रशासन पाठवणार पत्र
पुणे : आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड-2 सायकल स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व खोदाईची कामे सप्टेंबर 2026 पूर्वी पूर्ण करावीत आणि त्यानंतर रस्ते खोदण्यास परवानगी देऊ नये, अशा आशयाचे पत्र दोन्ही महापालिकांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जानेवारी 2026 मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड सायकल स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुणे ग्रँड-२ अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या स्पर्धेत तीन टप्प्यांत (स्टेज) 437 किलोमीटर अंतराचा समावेश होता. मात्र, 2027 मधील स्पर्धा सहा टप्प्यांत तब्बल 1,072 किलोमीटर अंतराची असणार आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक रस्ते दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 363 कोटी रुपये तर पीएमआरडीएने 240 कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
पहिल्या स्पर्धेपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांच्या माध्यमातून 437 किलोमीटरचे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकसित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुणे महापालिका क्षेत्रातील काही नव्याने विकसित रस्त्यांवर पुन्हा खोदाई करण्यात आल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला.
काही ठिकाणी खोदाई झाल्यामुळे संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीची ठेकेदारांची जबाबदारी संपुष्टात आली असून, आता त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला स्वतःच्या निधीतून खर्च करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, सायकल स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांवर खोदाई टाळण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या.
रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार
पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी म्हणजेच सप्टेंबरपूर्वी दोन्ही शहरात विविध कामांसाठी खोदाई करणाऱ्या एजन्सींना त्यांची कामे पूर्ण करण्याबाबत दोन्ही महापालिकांना विनंती करणार आहोत. त्यासंदर्भात पत्र ही पाठवणार आहोत. –
– जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे.
सहा टप्प्यांत होणार स्पर्धा
यंदा स्पर्धेचे स्वरूप विस्तारण्यात आले असून, विद्यमान तीन टप्प्यांची लांबी वाढविण्यासह आणखी नवीन टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा सहा टप्प्यांत होणार आहे.
प्रस्तावित टप्पे (स्टेज)
स्टेज 1 :
लेडीज क्लब ते नांदेड सिटी
अंतर – 177 किमी
मार्ग – 76 गावे व प्रमुख चौक
स्टेज 2 :
बारामती ते सासवड
अंतर – 174 किमी
मार्ग – 40 गावांतून स्पर्धा
स्टेज 3 :
जुन्नर ते राजगुरूनगर
अंतर – 152 किमी
मार्ग – 51 गावांतून स्पर्धा
स्टेज 4 :
आळंदी ते लोणावळा
अंतर – 183 किमी
मार्ग – 72 गावांतून स्पर्धा
स्टेज 5 :
लोणावळा ते हिंजवडी
अंतर – 202 किमी
मार्ग – 71 गावांतून स्पर्धा
स्टेज ६ :
पिंपरी-चिचवड ते पुणे
अंतर – २१०
मार्ग – 221 हून अधिक गावे, वस्त्या आणि प्रमुख चौकांमधून जाणार आहे.






