
Vasai Virar Municipal Election: वसई-विरार महापालिकेत राजकीय खळबळ; १६ नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी
Vasai Virar Municipal Election: वसई विरार महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध प्रकारची माहिती देणे अनिवार्य आहे. असे असताना निवडून आलेल्या बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका भारतीय जनता पक्षाचे नितीन ठाकूर यांच्यासह इतर अर्जदारांनी वसईच्या दिवाणी न्यायालयात दाखल केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणूकीत बविआने मित्रपक्षांसोबत ७१ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. यातील १६ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवल्याची माहिती भाजपचे पराभूत उमेदवार नितीन ठाकूर यांनी उजेडात आणली आहे.
या माहितीच्या आधारे त्यांनी वसईतील दिवाणी न्यायाधीश जी. जे. श्रीसुंदर यांच्या न्यायालयात याबाबत रिट दाखल केली आहे. बेकायदा बांधकामे असणे, दाखल गुन्ह्यांचे विवरण लपवणे, मालमत्ता दडवून ठेवणे ही माहिती निवडणूक आयोगापासून लपवण्यात आल्याची तक्रार ठाकूर यांच्यासह पराभूत उमेदवारांनी याचिकेद्वारे केली आहे. सोळा जणांच्या या यादीत मातब्बर व माजी नगरसेवकांचा भरणा आहे. वसई न्यायालयात विविध अर्जदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
यामध्ये निवडून आलेल्या आशिष वर्तक, अफीफ जमील शेख, लता कांबळे, सतूर जाधव, ज्योती घोडेकर, बिना फुटांडी, स्वप्निल कवळी, डॉमिनिक रुमाव, लॉरेल डायस, शेखर धुरी, कन्हैया (बेटा) भोईर, अर्शद चौधरी, जयंत बसवंत, दीपा पाटील, आलमगीर डायर व रमेश धोरकना या नगरसेवकांची नावे आहेत.
दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ८० (२) आणि एमएमसीए १९४९ च्या कलम ४८७ हे दावे दाखल आहेत. महानगरपालिका अधिनियमांतर्गत उमेदवाराने बेकायदा बांधकाम केले असेल अथवा त्याच्या नातेवाईकांनी अशा स्वरूपाची बांधकामे केली असतील तर अशा नगरसेवकांची पदे अपात्र घोषित केली जातात. उशिराने प्राप्त झालेल्या पुराव्यानुसार सत्तेत बसण्याची तयारी करणाऱ्या अशा १६ जणांची यादीच न्यायालयासमोर सादर केलेली आहे. यात निवडणूक प्रक्रियेत सामील असलेल्या अधिकाऱ्यांनाही सामील करण्यात आलेले आहे. भ्रष्ट मार्गाने ही प्रक्रिया झाली असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. हे उमेदवार अपात्र घोषित झाल्यास द्वितीय क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला नगरसेवकपद बहाल केले जाते.
Social Media Rumors Alert: उरणमध्ये ‘मुले पळवणारी टोळी’ ची अफवा? पोलिस तपासात झाले उघड
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.