विधानसभा निकालानंतर ठाकरेंच्या सेनेला गळती? नगरमधील बहुंताश पदाधिकारी शिंदेंच्या सेनेत जाण्याची शक्यता
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यावेळी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या निकालानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वपक्षातील उमेदवार न देता मित्र पक्षाच्या उमेदवाराला जागा दिल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. बहुतांश पदाधिकारी व शिवसैनिक येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटाचे नाराज झालेले पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत किंवा भाजपात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजकारणासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त झाले असताना विधानसभा निवडणुकीत मात्र आघाडीला चांगलाच फटका बसला. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश प्राप्त करत राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (फोटो सौजन्य – pinterest)
कधीकाळी अहिल्यानगर जिल्ह्यावर शिवसेनेचा मोठा प्रभाव होता. मात्र आज याच जिल्ह्यातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार झाल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्ह्यातील दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करत दोन जागा मिळविल्या. शिवसेनेने हक्काचे मतदारसंघ जागावाटपात मित्र पक्षाला दिल्याने तेथील पदाधिकारी नाराज झाले आहेत. याचा परिणाम निकालात देखील दिसून आला.
नगर शहरातील शिवसेनेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. यातील काही जणांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आपली राजकीय भूमिका अप्रत्यक्षपणे जाहीर केली. तर उर्वरित बहुतांश पदाधिकारी आता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच ठाकरे गटातील नाराज पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत किंवा भाजपात प्रवेश करणार असल्याचे माहिती मिळतं आहे. दरम्यान या पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यास आगामी काळात याचा मोठा फटका खासदार निलेश लंके यांना देखील बसू शकतो. कारण विधानसभेतील बंडखोरी रोखण्यात लंकेंना फारसे यश मिळाले नसल्याचे या नाराजीतून दिसून येते आहे.
राजकारणासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे तसेच वरिष्ठांच्या जागावाटपातील निर्णयामुळे नगरची जागा आघाडीला गमवावी लागली. वरिष्ठांच्या या निर्णयामुळे बहुतांश पदाधिकारी व शिवसैनिक नाराज झाल्याने पक्षांतर करणार असल्याचे सांगितलं जात आहे.
माजी आमदार स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने अनेक जण इच्छुक होते. या इच्छुकांमध्ये एकवाक्यता होत नसल्याचे पाहून पक्षातील वरिष्ठांनी नगरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर येथील पदाधिकाऱ्यांनी तातडीने शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेत खासदार संजय राऊत यांचा निषेध केला होता. यावेळी राऊत यांच्या विरोधात याच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असून लवकरच त्याचे देखील बिगुल वाजणार असल्याचे समजते. शहरातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी पक्ष बदल केल्यास याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीवर होणार असल्याचे देखील बोलले जाते आहे.
2003 साली अहिल्यानगर महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले. त्यानंतरच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भगवान फूलसौंदर यांनी मोठे यश संपादन करत शिवसेनेचा पहिला महापौर होण्याचा बहुमान मिळवला. तेव्हा पासून ते आतापर्यंत प्रत्येक महापौर निवडीत एकनाथ शिंदेंचा सहभाग कायम राहिला आहे.
अहिल्यानगर महापालिकेत आजपर्यंत शिवसेना पक्षातर्फे 4 जणांना महापौर होण्याचा बहुमान मिळाला आहे. 2003 साली प्रथम महापौर भगवान फूलसौंदर, शिला शिंदे (2011), सुरेखा कदम (2016), रोहिणी शेंडगे (2021) यांसह अनेक पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकेतील महत्वाच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती तसेच सदस्य होण्याचा मान मिळाला आहे.