आता 'या' जातीने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे; आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
पुणे : मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले होते. सरकारने पाचव्या दिवशी त्यावर एक तोडगा काढला. त्यांच्या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्यावर सरकारने सहमती दर्शवली. याविषयीचा एक शासन निर्णय घेण्यात आला. त्यावरून काही ओबीसी नेते अस्वस्थ झाले आहे. सरकारने दबावात निर्णय घेतल्याचा आणि ओबीसीत कुणबी घुसवल्याची चर्चा सुरू आहे. मंत्री छगन भुजबळही नाराज आहेत. अशातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.
धनगर समाज लढवय्या असून इतिहासात त्यांची ओळख राज्यकर्ता अशी आहे. समाजाने होळकरांचा वारसा अंगीकारून सामाजिक आणि राजकीय ओळख प्रस्थापित करावी. आरक्षण हा उन्नतीचा मार्ग असून तो सुरक्षित ठेवायचा असेल, तर धनगरांनी सर्व ओबीसी समाजाला एकत्र करून त्यांचे नेतृत्व करावे. आगामी निवडणुकांत ओबीसी आणि आरक्षणवाद्यांची सत्ता आणा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ते गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात झालेल्या सकल धनगर समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते. या वेळी अधिवेशनाचे अध्यक्ष विजय मोरे, डॉ. विकास महात्मे, रामराव वडकुते, तसेच विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर यांना धार्मिकतेत अडकवले गेले, पण त्या महान राज्यकर्त्या होत्या. धनगर आणि धनखड वेगळे असल्याचे सांगून समाजाचा हक्क हिरावला गेला. १९५० ते १९९० दरम्यान धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला. आजही कुणबी-मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र येऊन सत्ता काबीज करणे आवश्यक आहे.”
डॉ. विकास महात्मे यांनी समाजातील युवकांनी शिक्षण, संघटन आणि हक्क या त्रिसूत्रीवर भर देण्याचे आवाहन केले. आंबेडकर म्हणाले, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत दलित, ओबीसी आणि मुस्लिमांचे हक्क धोक्यात आहेत. त्यामुळे यापुढे माझे मत फक्त ओबीसी, आरक्षणवादी आणि मुस्लिम उमेदवारांनाच असेल.
हे सुद्धा वाचा : भाजपा शेतकरी विरोधी, अमित शाह महाराष्ट्रात आले पण…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल