सौजन्य - नवराष्ट्र टीम
नागपूर : महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर हतबल झाले. राज्यातील संकटात असेलेल्या शेतकरी प्रश्नावर अमित शाह एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व करणारेही मूग गिळून गप्प बसले हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा घोर अपमान असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
नाग लोक कामठी येथील काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे होते नव्हते, असे सर्व वाहून गेले आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप कवडीचीही मदत केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आले पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एक शब्दही काढला नाही. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून त्यांनी शेतकऱ्यांनाच वा-यावर सोडले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणे खते मोफत द्यावे व शेतकरी कर्जमाफी द्यावी या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण राज्याचे मुख्यंमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समोर तोंडही उघडले नाही, हा शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. शेतकरी मरत असतानाही भाजपा सरकार मदत करत नाही. हे अंत्यत दुर्दैवी आहे. तातडीने मदत जाहीर करावी याचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
काँग्रेस पक्षाचे शिबीर संपन्न
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागलोक कामठी, नागपूर येथे “आजचे शहरी राजकारण” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध शहरांतील माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, शहराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक तसेच निवडक प्रदेश पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्यांनी आगामी काळात शहरांमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे पक्षाचे ठाम धोरण स्पष्ट केले. सत्तेचे विकेंद्रीकरण हा काँग्रेसचा मूलमंत्र असून, त्यातूनच पक्षाला बळकटी मिळेल असे त्यांनी अधोरेखित केले.