
फोटो सौजन्य - Social Media
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानात होणाऱ्या या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी ऐतिहासिक श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात तब्बल दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाच्या कालावधीत मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती म्हणजेच दरबार साहिब उभारण्यात येणार आहे. या पवित्र स्थळी भाविकांना अनवाणी प्रवेश करावा लागणार असल्याने चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मैदान स्वच्छ व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे विशेष श्रमदान आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या श्रमदानात नांदेड जिल्ह्यातील विविध शाळा व प्रशिक्षण संस्थांमधील सुमारे १,५०० विद्यार्थी, विविध ॲकॅडमीतील ५०० विद्यार्थी, नांदेड महापालिकेचे कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून मैदानावरील खडे, दगड व कचरा वेचून परिसर स्वच्छ केला. या वेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, क्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुरा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, रेडक्रॉसचे हर्षद शहा, नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पांचगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खालसा हायस्कूल, राजर्षी पब्लिक स्कूल, नागार्जुना हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल यांसह पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था (एनजीओ), सोल्जर ॲकॅडमी, तोटेवाड फिजिकल ॲकॅडमी, नांदेड फिजिकल आणि गरुडा फिजिकल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. युवकांचा हा सहभाग पाहता सामाजिक कार्यात तरुण पिढी पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. या श्रमदान उपक्रमातून गुरुप्रती सेवा, समर्पण आणि प्रेमाची भावना अनुभवास आल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. नांदेड येथे सिख धर्मियांचे एक महत्त्वाचे तख्त असल्यामुळे या शहीदी समागम कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून तसेच विविध धर्म व समुदायांतील भाविक नांदेडमध्ये येणार आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रम हा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश देणारा असल्याचे सांगितले. सर्व धर्म व समुदायातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.