मुंबई : पावसामुळे भाज्यांचे दर महागले (Rates of Vegitables) असून, आता गृहिणींचे बजेट हाताबाहेर जात आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) कंबरडे आधीच मोडले असताना आता भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दराने (Tomato Price) मात्र एकप्रकारे कहरच केला आहे. मुंबईत आत्तापर्यंत कधी न गेलेला दर मिळाला आहे. मुंबईत एक किलो टोमॅटोचा दर तब्बल 160 रुपये झाला आहे. तर येत्या दोन दिवसांत हा दर 200 रुपये पार करेल, असे सांगितले जात आहे.
टोमॅटोसह इतर अनेक भाज्यांचे दर वाढताना दिसत आहेत. त्यात चहाचा स्वाद आणि स्वयंपाक घरातील गुणकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या अदरकसाठी दर किलोमागे 320 रुपये मोजावे लागत आहे. महागाईमुळे त्यांची विक्री निम्म्याने कमी झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. जे पूर्वी एक किलो टोमॅटो घ्यायचे ते आता पाव किलोवर आले आहे. घाऊक बाजारातून महागडा भाजीपाला मिळत असताना किरकोळ बाजारातही महागड्या दराने विकत आहोत. टोमॅटोचे भाव गडगडल्यानंतर देशाने अनेक ठिकाणी लाल चिखल पाहिला होता. पण यावेळी टोमॅटोचा भाव ऐकूनच ग्राहकांचे चेहरे लालबुंद होत आहे.
मागणी अधिक पण पुरवठा घटला
महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. बाजारात टोमॅटोचा तुटवडा आहे. टोमॅटोची आवक घटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मालही कमी येत आहे. मागणी जास्त असून, आवक कमी आहे. तो अवघ्या 20 टक्क्यांवर आला आहे. तर काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.