Primary Teachers Cooperative Bank Satara Chairman Election 2025
मेढा : दत्तात्रय पवार : प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेत शिक्षक समिती व संभाजी थोरात प्रणित शिक्षक संघांच्या परिवर्तन पॅनलची सत्ता आहे. मात्र या गटांमध्ये मतभेद झालेले पहायला मिळत आहे. तसेच नव्याने होणाऱ्या चेअरमन निवडीसाठी संचालकांमध्ये व नेत्यांमध्ये मोठे लॉबिंग सुरू झालेले पाहायला मिळत आहे. एकत्र निवडणूक लढवूनही वेवगवेगळ्या गटासोबत हातमिळवणी करत लोकशाहीची सर्व मूल्ये विसरून हे लॉबिंग सध्या सुरू असून किमान गुरुजींनो तुम्ही तरी लोकशाही टिकवा हो…! अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सिद्धेश्वर पुस्तके यांना बाजूला ठेवण्यासाठी संभाजीराव थोरात प्रणित शिक्षक संघाचे नेते बळवंत पाटील यांनी शिक्षक समितीशी जुळवून घेत परिवर्तन पॅनलची हाक दिली. सभासदांनी परिवर्तन पॅनलच्या ताब्यात बँकेच्या चाव्या दिल्या परंतु बळवंत पाटील यांच्या राजकारणातील अति महत्वकांक्षेमुळे परिवर्तन पॅनल एक विचाराने फार काळ कामकाज करू शकले नाही. किरण यादव यांना चेअरमन पदावरून हटवताना परिवर्तन पॅनल मधील अंतर्गत धुसपुस, बेबनाव सभासदांच्या समोर प्रकर्षाने आला. यादव यांच्यानंतर निशा मुळीक यांनी चेअरमन पद भूषवले त्यांच्या राजीनाम्यानंतर बुधवारी नव्याने चेअरमन निवड होणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चेअरमन निवडीसाठी सध्या प्राथमिक शिक्षक बँकेतील संचालकांमध्ये व प्रमुख नेत्यांमध्ये मोठे लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे नेमका चेअरमन कोणत्या गटाचा होणार याकडेच जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. सिद्धेश्वर पुस्तके यांना बँकेतून बाजूला ठेवण्यासाठी बळवंत पाटील यांनी जिल्ह्यात सुरुवातीपासूनच विरोधक असलेल्या शिक्षक समितीला सोबत घेऊन परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून पुस्तकेंना एकाकी पाडत सत्ता मिळवली. मात्र पाटील यांच्या अति महत्वकांक्षेमुळे शिक्षक समिती व थोरात प्रणित संघ यांच्यात अंतर्गत धुसफूस वाढली .ज्या पुस्तके गुरुजींना बाजूला करीत सत्ता मिळवलेल्या बळवंत पाटील यांनी अलीकडच्या काही काळात पुस्तके गुरुजींशी जुळवून घेतलेले पाहायला मिळत आहे .त्यामुळे शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघाचे चार संचालक असूनही महेंद्र जानुगडे चेअरमन होतील अशी शक्यता दिसून येत आहे.
शिक्षक समितीचे नेतृत्व राज्य शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष उदय शिंदे हे करीत आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिक्षक समितीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे शिक्षक समितीतील काही संचालक फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. या शिक्षक संचालकांमधून चेअरमन पदासाठी एक नाव पुढे येत असल्याची देखील चर्चा आहे.त्यामुळे नेमके या संचालकांना कोण ताकद देत आहे हे चेअरमन निवडी नंतर स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्राथमिक शिक्षक बँकेला गेल्या आठवड्यात रिझर्व बँकेने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. तर बँकेकडे नियमित पगार घेणारे शिक्षक सभासद कर्जदार आहेत. असे असताना देखील काही तालुक्यातील शिक्षक कर्जदार हे थकबाकीदार आहेत. ही नोकरदरांची बँक असूनही बँकेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे ही संस्था टिकली व वाढली पाहिजे यासाठी सेवानिवृत्त झालेल्या बळवंत पाटील,सिद्धेश्वर पुस्तके,उदय शिंदे, या शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी शिक्षक संघटना मजबूत पणे चालवावी मात्र बँकेतील आपली लुडबुड थांबवावी असा सूर शिक्षकांमधून उमटत आहे.
शिक्षक बँकेची चेअरमन खुर्ची सर्वच संचालकांना खुणावत आहे. यामध्ये बँकेचे अधिक ज्ञान नसणारे देखील मला चेअरमनच व्हायचं आहे. असे म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.मात्र त्यातूनही सध्या पुस्तके गटाचे महेंद्र जानुगडे ,शिक्षक समितीतून विशाल कणसे, नितीन काळे, चंद्रकांत कुंभार ,संजीवन जगदाळे यांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत.