Tamil Thalaivas register a resounding victory over Bengal Warriors in the Pro Kabaddi League
पुणे : औपचारिकता असलेल्या सामन्यात तमिळ थलाईवाज संघाने बंगाल वारियर्सचा ६०-२९ असा धुव्वा उडविला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात त्यांनी चार लोण चढवत गुणांचे अर्धशतकही साजरे करत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. मध्यंतराला त्यांनी १२ गुणांची आघाडी घेतली होती.
तमिळ व बंगाल या दोन्ही संघांच्या प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत तमिळ व बंगाल या दोन्ही संघांच्या प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याच्या आशा यापूर्वी संपुष्टात आल्यामुळे हा सामना एक औपचारिकताचाच भाग होता. तरीही उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवीत यशस्वी सांगता करणे हेच या दोन्ही संघांचे ध्येय आहे. त्या दृष्टीनेच हे दोन्ही संघ आजच्या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती. तमिळ संघाने आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी फक्त सहा सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे तर बंगाल संघाने तेवढ्या सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत.
अष्टपैलू खेळ करीत सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण
तमिळ संघाच्या खेळाडूंनी खोलवर चढाया आणि अचूक पकडी असा अष्टपैलू खेळ करीत सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळविले होते. दहाव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण नोंदविला आणि १६-६ अशी दहा गुणांची आघाडी घेतली. त्याचे श्रेय एकाच चढाईत चार गडी टिपणारा साईप्रसाद तसेच चढाईपटू मोईन शफागी, अभिषेक मनोकरण यांना द्यावे लागेल. पंधराव्या मिनिटाला त्यांच्याकडे २२-९ अशी आघाडी होती. ही आघाडी कमी करण्यासाठी बंगालच्या मनजीत, प्रणय राणे व सागर कुमार या खेळाडूंनी चांगली लढत दिली. मध्यंतराला तमिळ संघाकडे २५-१३ अशी आघाडी होती.
बंगालचे खेळाडू उत्तरार्धात आघाडी कमी करण्यासाठी कसे प्रयत्न करतात हीच उत्सुकता होती. बंगालचा खेळाडू मनिंदर सिंग याने यंदाच्या लीगमधील पकडीत गुणांचे शतक ओलांडले. मात्र अन्य खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे त्यांच्यावर पुन्हा लोण चढविला गेला. त्यावेळी तमिळ संघाकडे १६ गुणांची आघाडी होती आणि सामन्यात ते जिंकणार हे चित्रही स्पष्ट झाले होते. सामन्याची नऊ मिनिटे बाकी असताना तमिळ संघाने बंगाल संघावर तिसरा लोण चढविला आणि आपली बाजू आणखी बळकट केली. सामन्याची चार मिनिटे बाकी असताना त्यांनी गुणांचे अर्धशतकही पूर्ण केले. दोन मिनिटे बाकी असताना त्यांनी बंगाल संघावर चौथा लोण चढविला आणि मोठा विजय नोंदविला