खडई धनगरवाडी आणि करंबेळी ठाकुरवाडी रस्त्यासाठी वनजमिनीचा प्रस्ताव मंजूर
खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडी आणि करंबेळी ठाकुरवाडी या दोन आदिवासी वाड्यांसाठी रस्त्यासाठी लागणाऱ्या वनजमिनीचा प्रस्ताव अखेर वन विभागाकडून मंजूर झाला आहे. मागील चार वर्षांपासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे यश मिळाले असून, त्यामुळे पिढ्यानपिढ्यांचा वनवास अखेर संपणार आहे.
मुंबईपासून केवळ काही अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील या दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थ स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही रस्ता आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित होते. रस्त्यासाठी वनजमिनीचा प्रस्ताव सादर करूनही, खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी तीन वर्षांपासून प्रस्तावात वारंवार त्रुटी काढण्यात येत होत्या. पूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवला जात नव्हता.
खालापूर तहसील कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी संतोष ठाकूर यांना “तात्काळ निर्णय घेतला जाईल” असे लेखी आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नव्हती. या निष्क्रियतेमुळे दोन्ही वाड्यांना रस्त्यासारखी मूलभूत सुविधा मिळू शकली नव्हती.
यामुळे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि ‘रायगड भूषण’ पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संतोष घाटे, यशवंत माडे, पांडू हिरवा तसेच वाड्यातील आदिवासी बांधवांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. “वनजमीन स्थानांतर प्रक्रियेस मान्यता मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवू” असा निर्धार त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभय चव्हाण यांनी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावली. अधिकाऱ्यांमधील असमंजसपणामुळे आदिवासींना मूलभूत सुविधा मिळण्यास झालेल्या विलंबावर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते, गटविकास अधिकारी आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करत आठ दिवसांची कालमर्यादा ठरवून उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
तहसीलदारांच्या या निर्णायक भूमिकेनंतर सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा उपवनसंरक्षक यांनी दोन्ही वाड्यांच्या वनजमीन प्रस्तावास मंजुरी दिली. उजलोली ते करंबेळी ठाकुरवाडी रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे दीड कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश आधीच निघाले असल्याने, पुढील काही दिवसांतच रस्त्याचे काम सुरू होणार असून, ७८ वर्षांचा वनवास अखेर संपणार आहे.
या लढ्यात सक्रिय पाठिंबा देणारे राजकीय नेते, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच आंदोलनाची दखल घेऊन वारंवार बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकार बांधवांचे संतोष ठाकूर यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच, खालापूर तालुक्यात अजूनही १६ आदिवासी वाड्या अशाच परिस्थितीत असल्याचे सांगत, त्यांच्यासाठीही न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.