मुंबई : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावर खोट्या प्रकरणामध्ये सीबीआयमार्फत अटक करण्यात आली. त्याविरोधात आम आदमी पक्षातर्फे चर्चगेट स्थानक ते भाजप प्रदेश कार्यालय निषेध मोर्चा काढण्यात आला. चर्चगेटवरून भाजप प्रदेश कार्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. या निषेध मोर्चामध्ये प्रीती शर्मा मेनन यांच्या समवेत आम आदमी पक्षाचे मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस, उपाध्यक्ष पायस व्हर्गिस, द्विजेंद्र तिवारी, महमूद देशमुख आणि आम आदमी पक्ष मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आम आदमी पार्टी भारतात वेगाने वाढत असून, संपूर्ण देशभर पक्ष म्हणून आम आदमी पार्टीला चांगले यश मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीसमोर आपला टिकाव लागणार नाही, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला ग्रासलेले आहे. म्हणून या भीतीपोटी आपच्या मंत्र्यांना सीबीआय सारख्या सरकारी संस्थांमार्फत खोट्या, बनावट प्रकरणामध्ये अडकवून त्यांना अटक करण्याचे भ्याड व घाणेरडे राजकारण केंद्रातील भाजप सरकार करत आहे, याचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.
प्रीती शर्मा मेनन पुढे म्हणाल्या की, अदानी समूहाने करोडो रुपयांचा घोटाळा करून भारताच्या अर्थव्यवस्थेवर संकट आणले. त्या गौतम अदानींवर भाजप सरकारने सीबीआयतर्फे करवाई केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे मंत्री त्यावर साधे भाष्य सुद्धा करत नाहीत. मोदी सरकारच्या कार्यकाळात लाखो कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्यावर सीबीआयमार्फत कारवाई करण्यात आली नाही. पण आज दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती निर्माण करणाऱ्या मनीष सिसोदिया यांच्यावर कोणताही आधार नसताना खोट्या प्रकरणामध्ये सीबीआयमार्फत कारवाई केली जाते. हे अतिशय भ्याड व खालच्या पातळीचे राजकारण आहे. पण अशा भ्याड कारवाईला घाबरणारा आमचा पक्ष नाही. आम आदमी पार्टीचा आवाज हा देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. आम्ही यापुढेही भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत राहू.