गॅस तुटवड्यावरून जनता आक्रमक; संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गच रोखला
चाकण / अतिश मेटे : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा तीव्र झाल्याने संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून पुणे-नाशिक महामार्ग अडवला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने संतापाचा उद्रेक झाला. अखेर संतप्त नागरिकांनी एकत्र येत महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. “घर चालवणे कठीण झाले आहे, गॅस मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाकण वाहतूक पोलीस आणि दक्षिण चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या गॅस टंचाईमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचेही कारण असल्याचे बोलले जात आहे.
सध्या इराण–इस्त्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन व गॅस पुरवठा साखळीवर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून येत आहे.
चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा
चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग अडवला. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहिला मिळाले. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासनाकडून गॅस पुरवठा पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
हेदेखील वाचा : युद्धामुळे विवाह अडचणीत ! लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या; कॅटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली






