
Pune Metro Line 3, PMRDA Metro, Hinjawadi Metro,
पीएमआरडीएने हाती घेतलेल्या २३.२० किलोमीटर लांबीच्या या मेट्रो प्रकल्पातील माण (मेट्रो स्टेशन क्रमांक १) ते आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी (मेट्रो स्टेशन क्रमांक १२) या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) २३ जुलै रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर पुढील १० ते १५ दिवसांत मेट्रो सेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनाच्या प्रक्रियेमुळे सेवा सुरू होण्यास विलंब झाला.
मेट्रो प्रकल्पाबाबत पीएमआरडीए आणि सवलतधारक कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनी यांनी आवश्यक प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोयीनुसार वेळ निश्चित करून या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करण्याची विनंती करणारे विशेष पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवले होते.
यानंतर पंतप्रधान कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्र पाठवून याबाबत प्रशासकीय अभिप्राय मागवला. सामान्य प्रशासन विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रक्रिया पूर्ण करून पीएमओला सविस्तर अहवाल पाठवला आहे.
दरम्यान, माण-बालेवाडी या पहिल्या टप्प्यानंतर शिवाजीनगरच्या दिशेने आणखी चार स्थानके कार्यकक्षेत घेण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी कामाची गती वाढविण्याच्या सूचना पीएमआरडीएकडून देण्यात आल्या आहेत.
“या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान कार्यालयाला सविस्तर अहवाल पाठवला आहे. शिवाजीनगर मार्गाच्या दिशेने काही स्थानके सुरू व्हावीत म्हणून कामाची गती वाढवली आहे,” असे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.»
आता पंतप्रधान कार्यालयाकडून उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्यानंतर माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता उद्घाटनाच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. Pune