
Pune Railway, IRCTC, Diwali Ticket Booking, Indian Railways, Pune News, Festival Rush, Special Trains
नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्याने अनेक प्रवाशांनी दोन महिने आधीपासूनच प्रवासाचे नियोजन केले होते. आरक्षणाच्या तारखेवर लक्ष ठेवून सकाळी आठ वाजता संकेतस्थळ किंवा अॅपवरून तिकीट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गाडी आणि प्रवासाची तारीख निवडून पैसे भरण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचेपर्यंत जागा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. काही गाड्यांमध्ये वेटिंग तिकीट मिळण्याची शक्यताही संपल्याने प्रवाशांना निराश व्हावे लागले. ऑनलाइन आरक्षणातील अडचणी टाळण्यासाठी तिकीट खिडकीवर गेलेल्या प्रवाशांनाही अपेक्षित तिकीट मिळाले नाही.
Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास
पुण्याहून विदर्भाच्या दिशेने जाणाऱ्या अजनी-पुणे एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गरीब रथ, हमसफर एक्स्प्रेस आणि नागपूर-पुणे एक्स्प्रेसला सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. कोकण, मराठवाड्यासह दिल्ली, लखनौ, पटना, दाणापूर आणि कोलकाता या मार्गांवरही प्रवाशांची संख्या वाढते. आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस, लखनौ एक्स्प्रेस आणि दाणापूर एक्स्प्रेससारख्या गाड्यांनाही मोठी मागणी असते.
रेल्वेने यापूर्वी १२० दिवस आधी आरक्षणाची सुविधा दिली होती. नंतर हा कालावधी कमी करून ६० दिवस करण्यात आला. मात्र, आरक्षणाचा कालावधी कमी झाल्यानंतरही सणासुदीच्या काळातील मागणीत फारसा फरक पडलेला नाही. लांब पल्ल्याचा प्रवास तुलनेने सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर असल्याने रेल्वेला प्रवाशांची पसंती कायम आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या काळात अतिरिक्त आणि विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सणासुदीच्या काळात रेल्वे तिकिटांच्या मागणीत मोठी वाढ होत असल्याने दलालांच्या हस्तक्षेपाचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याची तक्रार आहे. आरक्षण केंद्रांवर तसेच ऑनलाइन आरक्षण प्रक्रियेत जलदगतीने तिकिटे बुक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे तिकीट आरक्षण प्रक्रियेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.
दिवाळीत गावी जाण्यासाठी यंदा जवळपास दोन महिन्यांपासून रेल्वेच्या तिकिटाचे नियोजन केले होते. आरक्षण सुरू होताच सकाळी आठ वाजता ऑनलाइन तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही मिनिटांतच कन्फर्म तिकिटे संपली. वेटिंगवर तिकीट काढण्याचा प्रयत्न केला, तर तेही उपलब्ध नव्हते. आता विशेष गाडी सुरू होईल, या आशेवर आहोत.
— निकिता देशपांडे , प्रवासी
एकूण फलाट : ६
दररोज धावणाऱ्या प्रवासी रेल्वे : सुमारे १७०
दररोजचे प्रवासी : सुमारे १ लाख ७० हजार
सणासुदीच्या काळातील दैनंदिन प्रवासी संख्या : सुमारे २ लाख
वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे आरक्षणाच्या प्रतीक्षा यादीतही वाढ होत असल्याचे चित्र.