गणेशोत्सव 2026 मध्ये108 रुग्णवाहिकांची अखंड सेवा! वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णांना मिळाली तात्काळ मदत
पुणे: गणेशोत्सव 2026 च्या कालावधीत भाविकांना तातडीची आणि प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 108 रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून पुणे शहर व पुणे जिल्ह्यात विशेष नियोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात एकूण 18 रुग्णवाहिका, तर पुणे जिल्ह्यातील पाच अष्टविनायक क्षेत्रे थेऊर, मोरगाव, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव येथे प्रत्येकी एक रुग्णवाहिका अशा एकूण 23 रुग्णवाहिका 24 तास तैनात ठेवण्यात आल्या होत्या.
MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
या विशेष सेवेसाठी 26 डॉक्टर, 26 ड्रायव्हर्स तसेच ऑपरेशनल स्टाफ असा सुमारे 57 ते 58 जणांचा मनुष्यबळाचा ताफा कार्यरत होता. गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात भाविकांना कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, हा या नियोजनाचा मुख्य उद्देश होता.
14 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत 108 रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून तब्बल 1,798 रुग्णांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार (On-Scene Treatment) देण्यात आले. त्यापैकी 167 आपत्कालीन रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या कालावधीत पाय घसरून पडणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डिहायड्रेशन, मद्यपानामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय समस्या, छातीत दुखणे तसेच कार्डियाक अरेस्ट यांसह विविध वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये 108 च्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाने तत्काळ सेवा दिली.
Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक पुणे शहर तसेच अष्टविनायक क्षेत्रांना भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर 24 तास सज्ज असलेल्या 108 रुग्णवाहिका, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि ऑपरेशनल टीमच्या समन्वयामुळे अनेक रुग्णांना वेळेत प्राथमिक उपचार मिळाले आणि गरजेनुसार पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. गणेशोत्सव 2026 दरम्यान 108 रुग्णवाहिका सेवेने केलेली ही कामगिरी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.






