पास विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट
पुणे : पुणे शहारातील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीने पुणेकरांना आनंदाची बातमी दिली आहे. पुणेकरांचा पीएमपीचा वाढता प्रवास पाहता हा प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी आता घरबसल्या पीएमपीचे तिकीट काढता येणार आहे.
पीएमपी प्रवाशांना अॅपवरून तिकीट काढण्याच्या सेवेबरोबरच आणखी दोन ऑनलाइन तिकीट काढण्याचे पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने सुचवलेल्या दोन कंपन्यांनी पीएमपीसाठी ऑनलाइन तिकीट व बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे.
सुरूवातीला पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन दिसणारी यंत्रणा गुगलसोबत विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण काही तांत्रिंक अडचणींमुळे हे काम होऊ शकले नाही. त्यानंतर पीएमपीने स्वत: प्रवाशांच्या सोयीसाठी अॅप बनवले आहे. अॅपच्या माध्यमातून या बसची ‘रिअल टाइम’ माहिती दिली जाणार आहे. पण सध्या या अॅपचे काम पूर्ण झाले असले तरी त्याच्या अंतिम चाचण्या सुरू आहेत.
पीएमपी अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ज्या बसने प्रवास करायचा आहे, त्या बसची माहिती घरबसल्या पाहता येणार आहे. सोबतच तिकीटही काढता येणार आहे. ज्या प्रवाशांनी घरबसल्या तिकीट काढले आहे, त्यांनी प्रवास करता वाहकाला क्युआर कोड दाखवल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल. या अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या अॅपवर पीएमपीच्या सर्व मार्गांची माहितीही मिळणार आहे. याशिवाय पीएमपीच्या वेळापत्रकासह विविध पासही या अॅपच्या माध्यमातून काढता येणार आहेत. अंतिम चाचण्या झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये हे अॅप सुरू केले जाणार आहे.