चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची महत्त्वाची माहिती
पुणे : शहरातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांपैकी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६.०६ टक्के आहे. सध्या शहरात ११ हजार ५५० सक्रीय रुग्ण असुन, गेल्या चोवीस तासांत २ हजार ४७१ रुग्णांची भर पडली आहे. शहरातील दोन रुग्णांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सर्दी, खोकला असला तरी नागरीकांनी कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ञ व्यक्त करीत आहेत.
शहरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला आहे. विशेषत: परदेशातून आलेल्या नागरीकांना ओमायक्रॅानची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर हा कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याचे दिसुन येत आहे. नोव्हेंबर महीन्यात परदेशातून पुण्यात आलेल्या काही प्रवासी हे कोरोना बाधित आढळून आले. त्यापैकी काही जणांना ओमायक्रॅानची लागण झाल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अिवनाश भोंडवे म्हणाले, ‘‘ सध्या शहरातील रुग्णवाढीचा वेग पाहता शहरात ओमायक्रॅानचा संसर्ग सुरु झाल्याचे दिसुन येत आहे. याचा संसर्ग हा पाच पट वेगाने होतो. ही रुग्णांची संख्या वाढणे हे अपेक्षितच होते, पुढील काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ’’ शहरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहे. सर्दी, खोकला हा थंडीमुळे होत असला तरी नागरीकांनी कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे असेही मत त्यांनी ‘ दै. नवराष्ट्र ’ शी बोलताना स्पष्ट केले.
शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीचा वेग टिकून राहीला आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात २ हजार ४७१ रुग्णांची भर पडली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ११ हजार ५५० इतकी झाली आहे. सक्रीय रुग्णांचा आकडा जरी अकरा हजाराच्यापुढे गेला असला तरी, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६.०६ टक्के इतकेच आहे. गेल्या चोवीस तासांत ७११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत शहरात ५ लाख २२ हजार ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यापैकी ५ लाख १ हजार ३३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९ हजार १२६ जणांचा मृत्यू झाला आहे.
‘‘ सध्या चाचण्यांची संख्या वाढली असली तरी, संसर्गाचा वेग लक्षात घेता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. सौम्य लक्षणे असल्याने अनेक जण कोरोना चाचणी करीत नाहीत. यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. सौम्य लक्षणे असली तरी नागरीकांनी सर्दी, खोकला, ताप असेल तर चाचणी करून घेणे आवश्यक आहे.’’ डॅा. अविनाश भोंडवे.