
पुणे येथे विषप्राशन करून जीवन संपवले
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे यांची आत्महत्या
तासगाव: पोलीस दलात अधिकारी म्हणून घडण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका होतकरू तरुण अधिकाऱ्याने आपले आयुष्य अकाली संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून, संपूर्ण पोलीस दलाला हादरवून टाकणारा हा धक्का आहे. तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरज मराठे यांनी आज सकाळी पुणे येथे विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवासी असलेले सुरज मराठे हे नुकतेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाले होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षण घेत होते. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, अशी प्रतिक्रिया त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Mumbai Crime: 45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना
सुरज मराठे हे अविवाहित होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते रजेवर होते. आज सकाळी त्यांनी अचानक विष प्राशन करून आयुष्याला पूर्णविराम दिला. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसून, अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत असून, एका होतकरू अधिकाऱ्याचे असे अकाली जाणे ही संपूर्ण व्यवस्थेसाठी अंतर्मुख करणारी आणि गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन
मुंबईच्या कांदिवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय सिक्योरिटी गार्डने आपल्याच घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या पीडित व्यक्तीने आत्महत्या करण्यासाठी त्याच्या लायसन्सी रिव्हॉल्वरचा वापर केला. ही घटना मंगळवारी घडली असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.