
७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात; 'PMPML' प्रवाशांच्या सेवेकरिता तयार, 'या' वेळेत देखील धावणार
पुणे: शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रमानांकित असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पीएमपीने दरवर्षीप्रमाणे रात्री विशेष बससेवा पुरवली अाहे. ही बससेवा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत असेल. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रिडा संकुलात हा महाेत्सव पार पडणार आहे . सदर महोत्सवाकरीता पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांच्या विविध भागांतून असंख्य रसिक श्रोतावर्ग उपस्थित राहताे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पुणे पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरता रात्री देखील सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या रसिक श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाकडून २५ टक्के जादा दराने बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या रसिक श्रोत्यांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीएमएलकडून उपलब्ध करून देण्यात आलेले बस आणि मार्ग
मुकुंदनगर ते निगडी भक्ती शक्ती (मार्ग क्र. ४२) ही बस दांडेकर पूल, डेक्कन, वाकडेवाडी, कासारवाडी,पिंपरी, चिंचवड स्टेशन या मार्गाने जाईल.
मुकुंदनगर ते धायरी मारूती मंदिर (मार्ग क्र. ११७) ही बस दांडेकर पूल, विठ्ठलवाडी,आनंदनगर, वडगांव फाटा, धायरी गांव या मार्गाने जाईल.
मुकुंदनगर ते कोथरूड डेपो (मार्ग क्र. १०३) ही बस टिळक रोड, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनी या मार्गाने जाईल.
मुकुंदनगर ते वारजे माळवाडी (मार्ग क्र. ७२) ही बस डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टॅण्ड, गांधी भवन, कर्वेनगर या मार्गाने जाईल.
या सर्व बसेस २० आणि २२ राेजी रात्री साडे दहा वाजता आणि २१ राेजी रात्री साडे बारा वाजता साेडल्या जातील. स्वारगेट मेट्रो स्टेशन बसस्थानक येथून महाराष्ट्रीय मंडळ क्रिडा संकुल, मुकुंदनगर, पुणे येथे रसिक श्रोत्यांना ये-जा करणेकरीता विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी तिकीटदर प्रति प्रवासी १०/- रू. इतका राहील.
७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात
परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करीत ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज सुरुवात झाली. दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय एकत्र येत सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन करत असतात. गेली ५० हून अधिक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. आज या प्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, शैला देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.