
पुण्यात मतदानादरम्यान ईव्हीएम बदलण्याचे सत्र; 20 कंट्रोल युनिट अन्...
सकाळी मतदान सुरू होताच अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीन सुरू न होणे, उशिरा कार्यान्वित होणे, बॅलेट युनिटवरील बटन नीट काम न करणे, स्क्रीनवर तांत्रिक संदेश दिसणे अशा तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. काही ठिकाणी लिंकिंग एररमुळे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांच्यातील समन्वय तुटल्याने मतदान प्रक्रिया काही काळ थांबवावी लागली. परिणामी, निवडणूक कर्मचाऱ्यांना पर्यायी यंत्रणा मागवून युनिट बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला.
निवडणूक प्रशासनाकडून “तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव ईव्हीएम उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ज्या ठिकाणी अडचण आली, तेथे तात्काळ कंट्रोल युनिट किंवा बॅलेट युनिट बदलून मतदान सुरळीत करण्यात आले,” असा खुलासा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक केंद्रांवर मतदारांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, दुपारपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर युनिट बदलणे ही गंभीर बाब मानली जात आहे. “ईव्हीएम सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचा दावा सातत्याने केला जातो. मात्र निवडणुकीच्या दिवशी वारंवार यंत्र बदलण्याची वेळ येणे, हे त्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे,” अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे. काही पक्षांनी तर यावरून थेट निवडणूक आयोग आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
मतदान प्रक्रियेत आलेल्या अडथळ्यांचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामगार वर्गासाठी वारंवार थांबावे लागणे हे निरुत्साही ठरत असल्याचे चित्र आहे. “मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो, पण मशीनच बंद असल्याने परत जावे लागले,” अशी खंत काही मतदारांनी व्यक्त केली.
एकीकडे प्रशासन यंत्रणा बदलून मतदान सुरळीत झाल्याचा दावा करत असली, तरी दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट बदलण्याची वेळ येणे ही पुणे महापालिका निवडणुकीतील एक मोठी राजकीय चर्चा ठरत आहे. निवडणूक संपल्यानंतरही ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर आणि व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित राहणार, हे मात्र निश्चित.
हे सुद्धा वाचा : ‘मतदार राजा जागा हो’चा अखंड जागर; अवलिया करतोय नागरिकांना मतदानाचे आवाहन