बारामतीमध्ये चक्क अजित पवारांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न; नेमके प्रकरण काय? जाणून घ्या
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे . तसेच साड्या राज्य सरकारने आणलेल्या अनेक श्रेयवादाची लढाई देखील महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. महायुतीतील वाद चव्हाट्यावर यायला नको अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या आहेत. मात्र आज बारामतीमध्ये वेगळाच प्रकार घडला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्याने झाकला आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा खटका उडाला आहे. आता या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
नेमके प्रकरण काय?
बारामती येथील शारदा प्रांगणात एकनाथ गणेश फेस्टिवल या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट न दिल्याने या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी स्वागत कमानी वरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा काळ्या कपड्याने झाकल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
दरम्यान तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करीत पवारांच्या फोटोवर काळे कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी सदर स्वागत कमानीवरील वरील फ्लेक्स हटविले. सुरेंद्र जेवरे यांनी गणेशोत्सवानिमित्त शारदा प्रांगण येथे एकनाथ गणेश फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची कमान बारामती शहरातील भिगवन चौक या ठिकाणी लावली होती. या कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र देखील लावण्यात आले होते. दरम्यान एकनाथ गणेश फेस्टिवल चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री पवार अनुपस्थित राहिल्याने सुरेंद्र देवरे यांनी या निषेधार्थ उपमुख्यमंत्री पवार यांचे छायाचित्र काळा कपड्याने झाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जेवरे यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर नगरपालिका प्रशासनाने सदर कमान तातडीने काढली.
बारामतीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कटआउटला काळे कापड लावून निषेध केल्याने बारामतीत काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी त्याच ठिकाणी अजित पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. मात्र या घटनेवरून अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी देखील टीका केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. कामामुळे त्यांना कार्यक्रमाला येणे शक्य झाले नसेल. वेळ मिळाला नसेल. काळे कापड प्रतिमेवर झाकले म्हणजे बारामतीचा विकास झाकला असे होत नाही. काळे कापड टाकून सूर्याला झाकण्यासारखा हा प्रकार आहे. काळे झेंडे दाखवणारे, व आज जो काही प्रकार घडला यामुळे त्यांच्याच पक्षाची प्रतिमा खराब होते. आजच्या प्रकारामुळे शिवसेना शिंदे गट बदनाम झाला आहे. तीनही पक्षात एकवाक्यता असल्याशिवाय विधानसभा निवडणुकीत यश मिळू शकणार नाही. अशा लोकांना त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठानी तंबी दिली पाहिजे. आम्हालाही भावना आहेत. भावनांचा उद्रेक झाल्यास आम्हीही शांत बसणार नाही.