मल्लिकार्जुन खरगेंचे पुण्यातून मतदारांना आवाहन; म्हणाले, "राज्य घटना आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी..."
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार जोरदारपणे सुरू आहे. दरम्यान निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान महाविकास आघाडीतर्फे राहुल गांधी यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. दरम्यान महाविकास आघाडीची प्रचारसभा पुण्याच्या वानवडी येथे पार पडली. यावेळी कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्य वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन देखील खरगे यांनी केली आहे.
पुणे, भारतीय राज्य घटनेमुळे दलित समाजाला आरक्षण मिळाले. भाजपने राज्यघटनेचा अपमान केला असून लोकांना जाती-धर्मांत विभागण्याचे काम भाजप करीत आहे. महाराष्ट्रातील उद्योग भाजपने गुजरातला पळवले आहेत. लोकशाही, राज्य घटना आणि हे राज्य वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.
भाजपा ने महाराष्ट्र में "50 खोखे, सब ओके" वाली सरकार तोड़-फोड़ कर के बनाई है।
महाराष्ट्र की जनता इस तोड़ने-फोड़ने, लूट और CBI-ED से चुराई हुई सरकार को बाहर का रास्ता दिखाएगी !
📍पुणे, महाराष्ट्र pic.twitter.com/I2rHrpeHXC
— Mallikarjun Kharge (@kharge) November 14, 2024
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दत्ता बहिरट, पर्वती मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ वानवडी येथील संविधान चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे उपस्थित होते.
हेही वाचा: “… हा स्थायीभाव पुणेकरांच्या नेहमी प्रत्ययाला येतो”; कसब्याचे उमेदवार धंगेकर यांचा भाजपवर घणाघात
तरुणांना रोजगार देण्याची घोषणा करणारे गप्प : खरगे
खरगे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या विकासावर बोलावे. गांधी परिवाराने आपले प्राण गमावले, त्या देशाचा मोदी, शहा या जोडीने नाश केला आहे. काॅग्रेसने विकसित केलेलं सगळे हे विकायला निघाले. महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले आहेत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा करणारे गप्प आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. महागाई वाढली आहे. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. राममंदिर आणि संसद भवन गळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे देशाला जोडण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी नागरिकांसाठी विविध योजना राबविणार आहे.
महायुतीमुळे महाराष्ट्र पिछाडीवर
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र अग्रस्थानी होता. मात्र, गेल्या काही वर्षांत महायुतीच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्र आता ११ व्या क्रमांकावर गेला आहे. येथे चांगले शिक्षण, पदवीधरांना नोकऱ्या देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उद्याच्या निवडणुकीत या निष्क्रिय सरकारला घरी बसवून महाविकास आघाडीला सत्तेत जाण्याची संधी द्या. शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम महाविकास आघाडी करेल. राज्यात सगळीकडे फिरतो आहे. महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याकडून प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्याने परिवर्तन होणे गरजेचे असल्याची भावना सर्वच स्तरांतून उमटत आहे. उद्याचे संकट टाळण्यासाठी यांच्या भूलथापांना बळी पडू नये. राज्याच्या हिताचा विचार करणाऱ्या महाविकास आघाडीला आशीर्वाद देऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास आपण प्राधान्य द्यावे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी घटनाविरोधी भाजप व त्यांना साथ देणाऱ्या संधीसाधू लोकांना सत्तेपासून हटवण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले.