कॉँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर (फोटो -ट्विटर)
पुणे: पुण्यात झालेल्या मोदींच्या सभेचा कोणताही इम्पॅक्ट मतदारांवर दिसून आला नाही. आज पुणे शहराला जे भरभराटीचे स्वरूप आले आहे, त्यातील काँग्रेसचे योगदान सगळे जाणून आहेत. त्यामुळे नुसती भाषणबाजी आणि प्रत्यक्ष काम हे मतदार मनाशी ताडून पाहतात, त्यात मोदी आणि भाजपचा बोलघेवडेपणा दिसून येतो आणि त्याचीच परिणीती या मतदानात होऊन मी अधिक मताधिक्क्याने निवडून येईल, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे कसबा मतदारसंघातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
धंगेकर म्हणाले की, पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए यासह असंख्य संरक्षण संस्था काँग्रेसच्या काळात उभ्या राहिल्या, नॅशनल व्हायरलॉजिकल इन्स्टिट्यूट सारख्या संशोधन संस्थाही पुण्यात उभ्या राहिल्या, सी डब्ल्यू पी आर एस या जलसंशोधन संस्थेचे विस्तारीकरण पुण्यात काँग्रेसच्या काळात झाले, लष्करी वैद्यकीय संस्थांसारख्या काँग्रेसने उभारलेल्या संस्थांमुळे पुण्याचे महत्त्व वाढले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात पुण्याच्या वैभवात भर घालणारी एकही नवी संस्था येथे उभी केली नाही. जागृत पुणेकर याची नोंद ठेवून आहेत.
‘महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणूक महत्त्वाची’
खोटे बोलणे हा भाजप नेत्यांचा स्थायीभाव पुणेकरांच्या नेहमी प्रत्ययाला येतो आहे. कालच पुण्यातील भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांनी पुरात पडलेल्या आंबील ओढ्याच्या भिंतीसाठी २०० कोटी रुपये आणून तो विषय मार्गी लावला असा धादांत खोटा दावा केला आहे. या दोनशे कोटीतील दोन रुपये सुद्धा प्रत्यक्ष कामाच्या उपयोगात आणले गेलेले नाहीत. हा निधी नेमका आहे कोठे हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. भाजपच्या काळात पुण्यातील ब्राह्मण समाजाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले. हा समाज खूप पूर्वीपासून सातत्याने भाजपच्या पाठीशी उभा असतानाही आज पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार ते देऊ शकलेले नाहीत, याची खंत पुणेकरांना आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ही निवडणूक अधिक महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी या निवडणुकीचे महत्त्व अधिक आहे हे पुणेकर जाणून आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे. २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस फुटल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. दरम्यान पुण्यातील कसबा मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कसबा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. त्यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला होता. दरम्यान महायुती-भाजपकडून विधानसभेसाठी पुन्हा एकदा हेमंत रासने यांच्यावरच विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे कसब्यात पुन्हा एकदा हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र जनता कोणाला साथ देणार हे पहावे लागणार आहे.