सासवड /संभाजी महामुनी: पुरंदर तालुक्यात वनांना आगी लागण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. वनांना लागलेल्या आगीत नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. मोठमोठाली झाडे जळून पशुपक्षांची आश्रयस्थाने नष्ट होत आहेत. त्याच बरोबर शेतातील शेतकयांच्या फळबागांचे नुकसान होत आहे. त्यामळे पशुं पक्षी मित्र आणि शेतकरी टाहो फोडत आहेत. मात्र वनविभागाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नसल्याने सर्वजण हतबल झाले आहेत. त्यामुळे पुरंदरचा वनविभाग कोठे आहे ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
मागील आठवड्यात दिवे, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी, गुरोळी, सिंगापूर आदी गावांना समांतर असलेल्या डोंगराला दुपारच्या वेळी वणवा लागल्याचे दिसून आले. मात्र नंतर एवढा भडकला, संपूर्ण डोंगर जळून खाक झाले. सायंकाळच्या वेळी त्याची तीव्रता वाढतच राहिली. उदाचीवाडी गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही उदाचीवाडी येथील सुभाष मगर यांची आंब्याची आणि इतर कित्येक झाडे त्यामध्ये नष्ट झाली परंतु वन विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे.
” आम्ही झाडकरी ” मिञांनी लावलेली साडे चारशे झाडे आगीत भस्मसात.
सासवड येथील सोपान नगरच्या जवळ सुमारे साडेचारशे विवीध प्रकारची झाडे आम्ही झाडकरी या सामाजिक संस्थेच्या मिञांनी लावली होती याचे संगोपन देखील चांगले केले होते. झाडांना खते, कीडनाशके टाकुन त्याला ड्रीप द्वारे पाणी देण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली होती. परंतु दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत सर्व झाडे जाळुन नष्ट झाल्याची माहिती आम्ही झाडकरी मित्र परिवारातील मिलींद गुजर यांनी दिली आहे. आंबा, जांभूळ अशा विविध प्रकारची झाडांच्या बिया आणुन त्यांचे संगोपन केले होते.
सामाजिक वने वाचाविण्याबाबत वनविभाग उदासीन. ,,,
पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरचा परिसर, चीव्हेवाडी घाट परिसर, सासवड जवळील वाघ डोंगर, काळदरी, पानवडी, ग्रामीण भागातील छोटे मोठे डोंगर या उन्हाळ्याच्या काही दिवसांत अक्षरशः जळून नष्ट झाला. मात्र वन विभागाने अद्यापपर्यंत एकही कारवाई केल्याचे दिसून आले नाही. दरवर्षी आग लावण्याचे प्रकार होत असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. समाज कंटकानी कित्येक ठिकाणी आगी लावल्या. मात्र एकही कारवाई दिसून आली नाही.
पुरंदर मधील वन संरक्षण समित्या फक्त सत्कारासाठी.
वन विभागाला सहकार्य करणे. ग्रामीण भागातील वनांचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांच्या हत्या रोखणे, वृक्षतोड थांबविणे,वनांना आगी लागल्यास नागरिकांची मदत घेवून ती आटोक्यात आणणे, वन विभाग करून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी वन संरक्षण समित्या स्थापन केल्या. मात्र या समित्या वर्षानुवर्षे केवळ कागदावरच राहिल्या असून समिती मधील पदाधिकारी ग्रामसभा, गावच्या कार्यक्रमात फक्त हार तुरे स्वीकारणे, अग्नपत्रिकेत नाव छापून सत्कार घेण्यात व्यस्त आहेत. स्थानिक गावातील नागरिकांना या समिती बद्दल फारसी माहिती दिली जात नाही. ग्रामपंचायत कारभारी त्यांच्या सोयीच्या व्यक्तींची नेमणूक करीत असल्याने केवळ एकमेकांची मर्जी राखण्यासाठी त्याचा उपयोग होत असल्याचे दिसत आहे.