Anil Deshmukh: "... अन्यथा सरकारला कोर्टात खेचणार''; 'या' प्रकरणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा
पुणे: गृहमंत्री असताना केलेल्या आरोपाची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांना नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच चांदीवाल अहवाल सादर न केल्यास सरकारला न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ वकील असीम सरोदे उपस्थित होते.
अनिल देशमुख म्हणाले, ”गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. आरोपांची चौकशी करण्यात यावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सखोल चौकशी करुन जनते समोर सत्य आणावे असे सांगितले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची नेमणूक केली होती. आयोगाने याप्रकरणात अनेकांच्या साक्षी नोंदविल्या, कागदपत्रे तपासली आणि ११ महिने चौकशी केली. नंतर १ हजार ४०० पानांचा अहवाल तयार करुन राज्य सरकारला सादर केला. २ वर्षांपासून हा अहवाल दडवून ठेवला आहे. या अहवालात मला क्लिन चिट दिली असल्याने सरकार तो सार्वजनिक करत नाही. चांदीवाल आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवावा. यामुळे अहवालाचे फायडिंग जनतेसमोर येईल. त्यातील सर्व गोष्टी जनेसमोर यायला हव्यात.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा पत्र लिहून सुद्धा दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यपालांना सुद्धा पत्र लिहून चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करण्यात आला होता.
सीबीआयकडून देशमुखांवर गुन्हा दाखल
महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांच्याखोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दवाब टाकल्याचा आरोप करत सीबीआयने देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: CBI कडून देशमुखांविरुद्ध ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल; माजी गृहमंत्री म्हणाले, फडणवीसांकडून…
गिरीश महाजन यांच्या या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांना आरोपी केले आहे. याआधी या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण इतर काही जणांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध जवाब दिला होता. त्यानंतर सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे.