पुणे: पुणे शहर परिसरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दुपारच्या वेळेस खडकवासल्यातून २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. दरम्यान संध्याकाळी ७ वाजल्यापासून खडकवासला धरणातून २८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुळा-मुठा नदीकाठच्या परिसरांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य पूरस्थितीबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजपुत झोपडपट्टीजवळील भिडे पुलाकडील रस्ता बंद करण्यात आला असून, वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नदीकाठच्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रविवारीही पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची नोंद झाली.
ताम्हिणी घाटात २८० मिमी, महाबळेश्वरमध्ये २०२ मिमी, लोणावळा १४८ मिमी, आणि मुळशीत १२० मिमी पाऊस झाला. पुण्यातील शिवाजीनगर, पाषाण, लवळे, लोणावळा, चिंचवड, कोरेगाव पार्क परिसरातही मध्यम पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खडकवासला प्रकल्पात २६.५४ टीएमसी म्हणजेच ९१.०३ टक्के पाणीसाठा झाला आहे. IMD ने पुणे, सातारा आणि घाटमाथ्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठानदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन संध्याकाळी ७ वाजता २८ हजार ६६२ क्यूसेक करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये. खबरदारी घ्यावी.
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे
Pune News: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून २५ हजार क्यूसेकने विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली तर…
भिडे पूल पाण्याखाली
पुण्यातून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. दरम्यान मुठा नदी पात्रात २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान मुठा नदी पात्रात पाणी पातळी वाढल्याने पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. गेले काही दिवस भिडे पूल वाहतुकीसाठी बंद आहे. दरम्यान आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात उतरू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे. काल संध्याकाळपासून धरणातूनपाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे.