
Chakan News : कुरुळीत अतिक्रमणावर मोठी कारवाई; पत्र्याच्या टपऱ्या हटवल्या, आता रस्त्याचे काम लवकरच?
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी सामोपचाराने सुमारे १६ फूट रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार अनेक नागरिकांनी स्वतःहून बांधकामे मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, त्यानंतर नऊ मीटर रस्त्याची हद्द निश्चित करून वडिलोपार्जित मिळकतीवरील बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने काही ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. कोणताही मोबदला न मिळता जागा सोडावी लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
विकासाला विरोध नाही; काम तातडीने सुरू करा
रस्त्याचे रुंदीकरण आणि गावाचा विकास यांना आपला विरोध नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करून रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर प्रशासनाने कामात दिरंगाई करू नये, अशी मागणी आता जोर धरत आहे. रस्त्याचे काम रखडल्यास नागरिकांना पुन्हा गैरसोयींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या उंचीबरोबर जलनिस्सारणाचे नियोजन आवश्यक
रस्ता तयार करताना केवळ रुंदीकरणावर भर न देता रस्त्याची उंची, घरांची पातळी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी रस्ता उंच आणि घरे सखल भागात असल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य गटारी बांधून प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
निकृष्ट काम झाल्यास विरोधाचा इशारा
अतिक्रमण हटवून जागा उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याचे काम दर्जेदार आणि तांत्रिक निकषांनुसार व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भविष्यात वारंवार रस्ता खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक कामांचे नियोजन आधीच करावे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
“कुरुळीकरांनी विकासाला कधीही विरोध केलेला नाही. अतिक्रमण हटाव कारवाईलाही सहकार्य केले आहे. आता प्रशासनाने रस्त्याचे काम तातडीने सुरू करून ते उत्तम दर्जाचे करावे. जलनिस्सारणाचे योग्य नियोजन करून कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास ग्रामस्थ विरोध करतील,” असा इशारा स्थानिकांनी दिला.
रस्त्याच्या विकासकामाला गती मिळणार का?
पक्क्या बांधकामांसाठी देण्यात आलेली १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर प्रशासनाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, तसेच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई झाली; आता रस्त्याच्या विकासकामाला गती मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.