बेशिस्त वाहन चालकांवर माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात तब्बल...
माळेगाव : माळेगाव शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि चौकांमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अपघातांची संख्या वाढत असल्याने आणि वाहतुकीत सतत अडथळे निर्माण होत असल्याने माळेगाव पोलिसांनी सरळ आक्रमक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. केवळ एका दिवसात तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करून बेशिस्त वाहनधारकांना चपराक लगावण्यात आली आहे.
निरा-बारामती रोड, आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, शिवाजी चौक हे माळेगावातील वाहतुकीचे मुख्य केंद्र आहेत. परंतु या ठिकाणी वाहनधारकांकडून बेशिस्त पद्धतीने पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. पादचारी मार्गांवर उभ्या केलेल्या दुचाक्या, चौकांमध्ये लावलेल्या चारचाकी यामुळे अपघात आणि नागरिकांचा त्रास वाढत चालला होता.
कडक अंमलबजावणीची सुरुवात
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे अंमलदार काका पाटोळे, अमजद शेख आणि गणेश खंडाळे यांनी कारवाईस सुरुवात केली. नियम मोडणाऱ्यांवर कुठलीही दया न दाखवता थेट दंडात्मक कारवाई केली. कारवाईदरम्यान अनेक वाहनधारकांना कडवट अनुभव घ्यावा लागला. या मोहिमेतून एका दिवसात ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करून पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना कठोर संदेश दिला आहे.
नागरिकांचा प्रतिसाद
या मोहिमेबाबत नागरिकांची मते विभागली गेली. काहींनी नाराजी व्यक्त केली, तर बहुसंख्य नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईला उत्स्फूर्त समर्थन दिले. “जेव्हा शिस्त पाळत नाहीत, तेव्हा कडक कारवाई अपरिहार्य ठरते. पोलिसांची ही वेळेवरची मोहिम स्वागतार्ह आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे. ही कारवाई फक्त दंडापुरती मर्यादित न ठेवता, बेशिस्त वाहनधारकांना कठोर धडा शिकवण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुढील काळात अपघात व वाहतूक कोंडीस जबाबदार असणाऱ्यांना थेट कायद्याच्या कचाट्यात सापडावे लागेल.
“माळेगावच्या रस्त्यांवर वाहतुकीची शिस्त प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. बेशिस्त पार्किंग आणि नियमभंगामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आम्ही आक्रमक कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी स्वतःहून नियम पाळावेत, अन्यथा दया दाखवली जाणार नाही. अपघातमुक्त आणि शिस्तप्रिय माळेगाव घडवणे हेच आमचे ध्येय आहे.”
– सचिन लोखंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, माळेगाव