MPSC Exam: Government playing with the future of students, atmosphere in Pune heated, clash between protesters and police, watch VIDEO
MPSC Students : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्री अचानक स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा झाले होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नेहमीची सरकारच्या निर्णयाच्या जाचाला समोरे जावे लागत आहेत. यावेळी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारविद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांनी काल पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून शास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. पण यामुळे पोलिस यंत्रणेची मात्र पुरती धावपळ उडाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी अपारदर्शकता या गोष्टींमुळे नाराज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आपला उद्वेग आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्तायादीत नाव न् आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
हेही वाचा : Amit Shah Maharashtra Visit: अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शिंदे यांची भेट; मध्यरात्री बंद दाराआड खलबतं
महाराष्ट्र गट ‘ब’च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेसाठी राज्य सरकारकडून ४४१ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले होते. तेवेळी राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाकडून मागणीपत्र राज्य सरकारकडे परत पाठवण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘पीएसआय’ पदांसाठी फक्त २१६ जागांचीच जाहिरात काढण्यात आली. त्यामुळे ४४१ पदांवरुन राज्य सरकारने २२५ जागा का कमी केल्या? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत असून पीएसआय पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
‘आयोग चुकत असतानाही रेटून नेण्याच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. अभ्यास करावा की रस्त्यावर उतरून आंदोलनाची लढाई लढावी हा पेचप्रसंग विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा तोंडावर असताना उद्याचे राजपत्रित अधिकारी असणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागते हे दुर्दैव आहे.’
एक विद्यार्थी, एमपीएससी
‘विद्यार्थ्यांवर होणार्या अन्यायाचा हा लढा असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची रास्त मागणी आहे. आयोगाच्या चुकांसाठी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी नुकसान झाले आहे. त्यासाठी आम्हाला मुख्य परीक्षेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी आमची मागणी आहे.’
एक विद्यार्थिनी, एमपीएससी
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. मात्र हे आंदोलन बेकायदेशीरअसल्याचे सांगून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना उचलून नेण्यात आले. याबत आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगण्यात आले की, “जवळजवळ दोन महिन्यांपासून पोलिस परवानगीसाठी परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्याकडे निवेदन देण्यात येत होते. मात्र, आम्हाला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळ करत असल्याने आम्हाला संविधानिक मार्गाचा अवलंब करावा लागला.” शुक्रवारी (ता. ११) पावणेनऊ वाजताच्या आसपास शास्त्री रस्ता येथील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले. त्यानंतर साधारण सव्वानऊ वाजता पोलिसांचा फौज फाटा आंदोलन ठिकाणी आला. तेव्हा काही विद्यार्थ्यांना फरासखाना पोलीस ठाणे येथे नेण्यात आल. त्यामध्ये विद्यार्थी आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.
राज्यसेवा परीक्षा 1 डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली आणि १२ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सुधारित निकालामध्ये ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील ३१८ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. मात्र या निकालामध्ये देखील चुका असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेत कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील अनेक विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत आले नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये धाव घ्यावी लागली. आयोगाच्या या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या तयारीचा अत्यंत मौल्यवान असा वेळ वाया गेला आहे. त्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद १६ नुसार सर्वांना समान संधी मिळण्यासाठी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून यावेळी करण्यात आली आहे.