भोर: राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप, वंचित बहुजन आघाडीने आणि राज्यातील तिसरी म्हणजेच परिवर्तन महाशक्ती आघाडीने आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच विधानसभेच्या भोर मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीमधील इच्छुकांनी काही दिवसांपासून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजीत करत महिलांना भेटवस्तू देऊन तर काहींनी देवदर्शन,रक्षाबंधन सारखे कार्यक्रम घेऊन जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली असून दोन्ही आघाडीतील मल्लांनी गेल्या सहा महिन्यापासून निवडणुकीच्या मैदानात ‘शड्डू’ ठोकले आहेत.
महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांचे एकच नाव अधिकृतपणे उमेदवारीसाठी वरीष्ठांकडे पाठवले आहे.तर शिवसेना (उबाठा)चे शंकर मांडेकर महाविकास आघाडीकडून मला उमेदवारीचा शब्द मिळाल्याचे सांगत आहेत. मागील गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभूत झालेले शिवसेना (शिंदेगट) चे कुलदिप कोंडे पुन्हा नशीब आजमावण्यासाठी महायुतीकडून प्रबळ दावेदार मानले जातात. भाजपाचे किरण दगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, शिवसेना (शिंदे गट)चे बाळासाहेब चांदेरे आपल्यालाच तिकीट मिळणार यावर ठाम आहेत.तिकीट मिळाले नाहीतरी निवडणूक लढवायची यादृष्टीने किरण दगडेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू ठेवले आहे.
मात्र महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खा सुप्रिया सुळे यांनी संग्राम थोपटे हेच उमेदवार असणार असल्याचे जाहीर केल्याने शिवसेना (उबाठा) गटाचे कार्यकर्ते नाराज होऊन जिल्हाध्यक्ष शंकर मांडेकर यांनी देखील मतदार संघात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजीत करत जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपण दावेदार असल्याचे जाहीर केले आहे.असे असले तरी राष्ट्रवादी पक्ष व शिवसेना पक्ष फुटीनंतर दोन्ही पक्षातील इच्छुकांची संख्या रोडावली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्याकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून भोर मधून कुलदीप कोंडे, मुळशीतून बाळासाहेब चांदोरे तर भाजपा भोर मधून तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, विधानसभा अध्यक्ष किरण दगडे पाटील हे इच्छुक असले तरी महायुतीचे पक्ष श्रेष्ठी कोणाला अधिकृत उमेदवारी देणार ? व उर्वरीत इच्छुक पक्ष श्रेष्ठीचा आदेश मान्य करणार का ? की पक्षांतर्गत बंडाळी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन २००५ च्या विधानसभेपर्यंत या मतदार संघात भोर व राजगड (वेल्हे) तालुक्याचा समावेश होता. मात्र २००९ मधील पुनर्रचनेनंतर मुळशी तालुक्याच्या समावेशाने ‘भोर-राजगड (वेल्हा) मुळशी’ असा नवा मतदार संघ झाला. महाडच्या वरंधा घाटापासून सुरू झालेला हा मतदार संघ वेल्ह्यातील मढे घाट, लवासा ते मुळशी ताम्हिणीपर्यंत पसरलेला आहे. बऱ्यापैकी ग्रामीण, दुर्गम, डोंगर- दऱ्यातील वस्ती, सात मोठी धरणे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि जंगलाखालील क्षेत्राची मोठी व्याप्ती, राज्यातील भौगोलीकदृष्ट्या सर्वात मोठा हा मतदार संघ आहे.
आतापर्यंत या मतदार संघात १९५२ ते २०१९ पर्यंत मामासाहेब मोहोळ (काँग्रेस आय पक्ष), कॉम्रेड जयसिंग माळी.(लाल निषाण पक्ष) ,शंकरराव भेलके. (काँग्रेस आय पक्ष) ,संपतराव जेधे. (अपक्ष), अनंतराव थोपटे (काँग्रेस आय पक्ष)सहावेळा, काशिनाथराव खुटवड (राष्ट्रवादी काँग्रेस) एकदा, तर संग्राम थोपटे (काँग्रेस आय पक्ष) यांनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे १९५७, १९७२ व १९९९ चा अपवाद वगळता या मतदार संघातील मतदारांनी सातत्याने काँग्रेसला खंबीर साथ दिल्याचे दिसून येते.ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी कार्यकत्यांची मोट बांधून तळागाळापर्यंत पक्षाची उभारणी भक्कमपणे केली. तर कार्यकर्त्याशी नाळ जुळल्यामुळे खंबीरपणे सत्ता राखण्यात यश मिळवले. त्यामुळे १९९९ चा अपवाद वगळता सहा वेळा मतदारांनी त्यांच्या हाती सत्तेची समीकरणे सोपावली होती.त्यानंतर संग्राम थोपटे यांनी पक्षाची पुर्नबांधणी करून कार्यकत्यांची मोठी फळी व ताकद पक्षामागे उभी केली आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकी ची हँट्ट्रीक केली.
या विधानसभा निवडणुकीत मात्र यावेळी वेगळेच चित्र निर्माण झाले आहे मतदार राज्याला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांकडून नवीन नवीन शक्कल लढवली जात असून भोर, राजगड (वेल्हे) मुळशी तालुक्यात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची जोरदार लगबग सुरू आहे.आचारसंहिते पूर्वी विकास कामांची भूमिपूजने, उद्घाटनांचा धुमधडाका चालू आहे. भेट वस्तूंचे वाटप आणि यात्रांचा नवा फंडा प्रथमच पाहायला मिळाला.आपला कार्यक्रम कसा सरस होईल, लोकांची गर्दी उसळेल, यासाठी खेडोपाडी कार्यकर्त्यां मार्फत गाड्यांचे नियोजन करुन कार्यक्रमांना जास्त प्रमाणात लोक कसे उपस्थित राहतील, यासाठी चांगलेच नियोजन करण्यात आले होते; मात्र लाभ मिळतोय म्हणून सर्वांच्याच कार्यक्रमात तीच मंडळी पहायला दिसत होती असे असले तरी मतदार कोणाला कौल देणार ? हे लक्षवेधी ठरणार आहे.यासाठीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणच आमदार होणार असे सांगून इच्छुकांनी अप्रत्यक्षपणे तर कांहीनी थेट प्रचाराला सुरवात केली आहे.