पुण्यात भाजपचे इच्छुक टेन्शनमध्ये (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: खडकवासला, कसबा आणि पुणे कॅन्टाेन्मेंट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने इच्छुकांचे ‘टेन्शन’ वाढले आहे. यामध्ये दाेन विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. पुणे कॅन्टाेन्मेंट मतदारसंघातून काॅंग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सध्या रंगली आहे. तर मनसेची पुण्यात काय भुमिका ठरणार यावरच बरेच चित्र अवलंबून असेल.
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघातील विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिराेळे यांची नावे पहिल्या यादीतच आल्याने त्यांनी सुस्कारा साेडला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विराेधात माजी नगरसेवकांनी दंड थाेपटले आहेत. त्यांच्या उमेदवारीला विराेध केला आहे, त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसमधील एका स्थानिक नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देऊन त्याला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. आमदार तापकीर यांनी पक्षीय पातळीवर बाजू मांडली आहे. खडकवासला मतदार संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला द्यायचा आणि त्या बदल्यात वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला घ्यायचा अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याने या दाेन्ही मतदारसंघातील महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. या मतदारसंघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. मनसे, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे.
पुणे शहरातील राखीव मतदारसंघ असलेल्या पुणे कॅन्टाेन्मेट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या मतदारसंघातून काॅंग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. काॅंग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले अविनाश साळवे यांनीही उमेदवारीसाठी दावा केला असून, बागवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे . यामुळे भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघ हा पाेटनिवडणुकीमुळे गाजला हाेता. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव भाजपच्या उमेदवारांच्या पहील्या यादीत येत असते. परंतु यावेळी कसब्यात भाजपकडून काेण ? याची उत्सुकता आहे. पाेटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने हे पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत. तर शहराध्यक्ष धीरज घाटे, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल, दिवगंत खासदार गिरीष बापट यांची सून स्वरदा हे देखील भाजपचे उमेदवार असू शकतात.
मनसे आठही जागी लढणार ?
मनसेकडून विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात अधिकृत भुमिका काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शहर मनसेकडून आठही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी केली गेली आहे. यामुळे पुणे शहरात मनसेचा मतदार असुन, त्याची भुमिका निर्णायक ठरु शकते.
शिंदे गटाचे काय ?
शहरातील आठ पैकी सहा मतदारसंघ हे भाजपच्या वाट्याला तर हडपसर आणि वडगांव शेरी हे दाेन मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात एकही जागा मिळण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा याकरीता शहराध्यक्ष नाना भानगिरे प्रयत्न करीत असुन, त्यास किती यश मिळणार हे दाेन दिवसांत स्पष्ट हाेईल.