पुणे; स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून चालविण्यात यावी, या संदर्भातील अर्जावर पुण्याचे विशेष न्यायालय सात एप्रिलला आदेश देणार आहे. राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी हा अर्ज केला असून, या संदर्भात दावा दाखल करणारे सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनीही त्याला सहमती दर्शविली आहे.
याबाबत, विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने हा खटला ‘समन्स ट्रायल’ स्वरुपात चालविण्यास परवानगी दिल्यास दोन्ही पक्षांना पुरावे सादर करून साक्ष व उलटतपासणी नोंदविता येणार आहेत. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते; त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामध्ये विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला असून, खटल्याच्या सुनावणीसाठी स्वत:ऐवजी वकिलामार्फत हजर राहण्यासाठी गांधींनी केलेला अर्जही मंजूर केला आहे. या प्रकरणी आता ७ एप्रिल रोजी आदेश होणार आहे.
राहुल गांधींना न्यायालयाने ठोठावला दंड
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सतत सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. तसंच १४ एप्रिलपर्यंत न्यायालयात कोणत्याही परिस्थिती हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
वकील नृपेंद्र पांडे यांनी २०२२ मध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) च्या कलम १५६ (३) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांना ‘ब्रिटिशांचे सेवक’ आणि ‘पेन्शनधारक’ म्हटलं होतं, असा आरोप वकील नृपेंद्र पांडे यांनी तक्रारीत केला होता. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते.
Rahul Gandhi : राहुल गांधींना न्यायालयाने ठोठावला दंड, सावरकरांवर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
५ मार्च २०२५ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, राहुल गांधी यांच्या वतीने, त्यांचे वकील प्रांशू अग्रवाल यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. आजच्या सुनावणीला आपण हजर राहणार नसल्याचं या अर्जात म्हटलं होतं. राहुल गांधी सध्या संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. आज (५ मार्च) त्यांची एका विदेशी नेत्याशी पूर्वनियोजित भेट झाली. याशिवाय, इतर अधिकृत कामात व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. राहुल गांधी न्यायालयाचा आदर करतात, असं त्यांनी म्हटलं आहे.