
Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
पुणे : शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर किंवा कचरा जाळून शेकोटी करून हवा प्रदुषण केल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर किंवा कचरा जाळल्यानंतर केवळ हवा प्रदूषण होते, असे नाही तर याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होतो. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड पीएम १०, पीएम २.५ आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. त्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर हवेची गुणवत्तेत राखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. त्यानुसार उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई आहे.
शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवतात. यामध्ये लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळला जातो. यामधून निर्माण होणाऱ्या धुरांमुळे शहरातील हवा प्रदूषण वाढते.
त्यामुळे वॉचमन, सफाई कामगार, इतर कामगार, व्यक्ती, महापालिका कर्मचारी, कंत्राटी कामगार किंवा महापालिका ठेकेदाराचे कंत्राटी कामगार यांसह इतरांनि शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केल्यास किंवा शेकोटी पेटवून हवा प्रदुषण केल्यास संबंधीतांवर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल, असा ईशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. सोमवारी (ता. १८) पुणे परिसरात ९.४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुणेकर थंडीने गारठले आहेत. तर पुढील दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात अंशतः वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शहर आणि उपनगर परिसरात किमान तापमानात गेल्या एका आठवड्यात पाच अंश सेल्सिअसची घट झाली आहे.
काही दिवसांपूर्वी १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलेले किमान तापमान मंगळवारी ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. शहरातील पाषाण भागात ९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. परिणामी पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गारठा वाढला आहे. शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव कायम राहते. तर पुढील दोन दिवस किमान आणि कमाल तापमानामध्ये आणखी किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.