"आता हीच आघाडी कायम ठेवून संजय जगताप यांनी..."; मविआमधील 'या' नेत्याचे मोठे वक्तव्य
सासवड: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर होताना पाहायला मिळत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीआधी पुरंदरमधील देखील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही आघाडीचा धर्म पाळत संजय जगताप यांना मदत केली, आता हीच आघाडी कायम ठेवून संजय जगताप यांनी मोठ्या मनाने राष्ट्रवादीला मदत करावी. असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव झेंडे यांनी केले आहे. नेमके हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात.
१९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पुरंदर तालुका राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे निवडून आले. त्यानंतर सलग दोन निवडणुकीत शिवसेनेचे विजय शिवतारे निवडून आले होते. आणि संजय जगताप यांचा पराभव झाला. तसेच २०१९ मध्ये शरद पवार यांनी मला निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले होते त्यानुसार माझा अर्ज भरून तयार होता. तिरंगी निवडणुक झाल्यास पुन्हा विजय शिवतारे निवडून येण्याची शक्यता होती. त्यामुळे मला अर्ज मागे घेण्यास सांगून संजय जगताप यांना पाठींबा देण्यास सांगितले. आमच्या आघाडीमुळे जगताप यांचा विजय झाला. आम्ही आघाडीचा धर्म पाळत संजय जगताप यांना मदत केली, आता हीच आघाडी कायम ठेवून संजय जगताप यांनी मोठ्या मनाने राष्ट्रवादीला मदत करावी. असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव झेंडे यांनी केले आहे.
संभाजीराव झेंडे आणि संजय जगताप यांच्यामध्ये मागील आठवड्यात जोरदार सोशल वॉर रंगले होते. त्यामुळे याची सर्वत्र जोरदार चर्चा होता. तसेच दोघांमधील राजकीय वाद रंगणार का? असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर झेंडे यांनी एक पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, बंडूकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, राहुल गिरमे, सयाजी वांढेकर, दीपक टकले आदी यावेळी उपस्थित होते.
मी मुंबईवरून शरद पवार यांची भेट घेवून येत असताना काही पत्रकारांनी निवडणूक बाबत विचारले, त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र संजय जगताप यांच्यावर टीका करण्याचा कोणताही हेतू नव्हता, मी आजपर्यंत कोणावरही कधीच टीका केली नाही आणि करणारही नाही. मात्र त्यांनी स्वतःच व्हिडिओ क्लिप तयार करून माझ्या विरोधात व्हीप आणि पक्षनिष्ठा बाबत मत व्यक्त केले. त्यांनी स्वतःच अंगावर ओढून घेतले. त्यामुळे त्यांनी तो व्यक्तिगत स्वरूपात घेवू नये, असे आवाहनही झेंडे यांनी आमदार जगताप यांना केले आहे
यंदा निवडणूक लढविणारच
मी यशवंतराव चव्हाण भवन मध्ये सुप्रिया सुळे यांनाही माझी भूमिका सांगितली असून पक्षाने पुरंदर तालुक्यात तसा एकमुखी ठराव केल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. यापूर्वी १९६७ मध्ये बापुसाहेब खैरे कॉंग्रेसचे आमदार होते. त्यानंतर २०१९ पर्यंत तालुक्यात कॉंग्रेसला आमदार पदाची संधी मिळाली नाही. तब्बल ५२ वर्षानंतर पुरंदरला काँग्रेसचा आमदार मिळाला आहे. हा इतिहास आहे. राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे स्वबळावर निवडून आले होतें. तर संजय जगताप यांच्या विजयात राष्ट्रवादीचा सहभाग आहे. त्यामुळे जसे आम्ही आघाडीचा धर्म पाळला. तसे आता त्यांनीही आघाडीचा धर्म पाळावा. असे सांगतानाच यावेळी निवडणूक लढविण्यावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे स्पष्टीकरण संभाजीराव झेंडे यांनी दिले.
पुरंदरला आघाडीचेच काम करणार : माणिकराव झेंडे पाटील
संभाजीराव झेंडे यांच्यासाठी आम्ही तालुका पक्षाच्या वतीने पक्ष नेत्यांना उमेदवारी मागितली आहे. आणि उमेदवारी मिळविण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु आघाडीमध्ये निवडणूक लढविताना पक्षाने संजय जगताप यांची उमेदवारी कायम करून काम करण्याचे आदेश मिळाल्यास पक्ष नेत्यांच्या आदेशानुसार आघाडीचे काम करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी दिली आहे.