
Palghar Mob Lynching Case:
Palghar Mob Lynching Case: पालघर जिल्ह्यातील भाजप गोटातून मोठी घडामोड समोर आली असून काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला प्रदेश कार्यालयाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी चौधरी यांचा पक्षप्रवेश तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात पूर्वी भाजपनेच काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यभरातून विरोधकांकडून तीव्र टीका आणि आरोपांची मालिका सुरू झाली होती. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींनी चौधरी यांच्या प्रवेशावर प्रदेश कार्यालयामार्फत स्थगिती लागू केली आहे.
Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला
पालघर साधू हत्याकांड (Palghar Mob Lynching Case) प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक स्तरावर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे.
तपासातील अधिकृत नोंदींनुसार, कोणत्याही एफआयआर किंवा चार्जशीटमध्ये काशिनाथ चौधरी यांचे नाव नाही. तरीदेखील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पक्षाने सावध भूमिका घेत त्यांच्या प्रवेशावर प्रदेश पातळीवरून तातडीची स्थगिती लागू केली आहे, अशी माहिती भाजप नेते व प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली.
काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील एक स्थानिक राजकीय नेते असून त्यांचा उल्लेख बहुचर्चित पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित म्हणून केला जातो. या घटनेनंतर भाजपने त्यांच्यावर मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र अलीकडे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
चौधरी हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) स्थानिक पातळीवरील नेतृत्वात कार्यरत होते. 16 नोव्हेंबर 2025 रोजी एका मोठ्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
काशिनाथ चौधरी यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पासून थेट भाजपपर्यंत पोहोचलेला आहे. पालघर साधू हत्याकांडात त्यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. मात्र स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना पक्षात दाखल करून घेतल्याने मोठी चर्चा रंगली आहे. पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे प्रमुख नेते तसेच जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यामुळे या निर्णयाला अधिक राजकीय वजन मिळाले.
16 एप्रिल 2020 रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात सुमारे 200 जणांना अटक करण्यात आली होती. त्याच वेळी भाजपने चौधरी यांच्यावर या घटनांचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. या हत्याकांडामुळे राज्यभर प्रचंड राजकीय वादंग उसळला होता. विरोधकांच्या मते, ज्यांच्यावर पूर्वी गंभीर आरोप केले गेले, त्यांनाच भाजपमध्ये घेतल्याने पक्षावर “दुटप्पीपणाचा” आरोप होत आहे. काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील बांधकाम व वित्त समितीचे माजी सभापती असून, स्थानिक नेता म्हणून त्यांचा लक्षणीय सामाजिक आणि सार्वजनिक दबदबा आहे.