
पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडी समोर बसून आंदोलन
महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदार याद्यांमध्ये गंभीर घोळ असून, बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे.
या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. घटनेबाबत निवडणूक प्रशासनाकडून पुढील चौकशी व आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : ईश्वरपुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन वाद
पुणे महापालिका संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करण्यासाठी पिंपरीमध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदान केंद्रामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल, पर्स, पिशवी असे सामान घेऊन जाण्यास मनाई आहे. यासाठी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून मोबाईल घेऊन जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मात्र याच कारणावरुन पिंपरी चिंचवडमधील काही मतदार केंद्राबाहेर वाद झाल्याचे देखील दिसून आले आहे. पिंपरी चिंचवडमधील काही भागांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी द्यावी असे काही जणांनी सांगितले. यासाठी त्यांची केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. यामुळे अनेक केंद्राबाहेर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई असल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले आहे.