
मतदार यादीतील गोंधळ पुन्हा एकदा आला समोर
एकाच मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या मतदान यादीत
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न
आकाश ढुमेपाटील/पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (Pune Election) निवडणुकीदरम्यान मतदार यादीतील गोंधळ पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे. शहरातील काही भागांमध्ये एकाच मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या वॉर्ड किंवा मतदान केंद्रांच्या यादीत आढळून आल्याने निवडणूक प्रशासन सतर्क झाले आहे. दुहेरी मतदानाचा कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा मतदारांकडून थेट लेखी हमीपत्र घेतले जात असून, या उपाययोजनेमुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर आपले नाव दोन ठिकाणी नोंदले असल्याचे निदर्शनास आणले. वॉर्ड पुनर्रचना, पत्त्यांतील बदल, स्थलांतर तसेच जुन्या नोंदी अद्ययावत न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अशा प्रकरणांमध्ये मतदान अधिकाऱ्यांकडून मतदाराची ओळख तपासल्यानंतर, “मी केवळ एका ठिकाणीच मतदान करणार असून दुहेरी मतदान करणार नाही,” असे नमूद करणारे हमीपत्र मतदाराकडून घेतले जाते.
या संपूर्ण प्रक्रियेवर राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जात आहे. आयोगाच्या नियमांनुसार दुहेरी मतदान हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे हमीपत्र देणे हे केवळ औपचारिक पाऊल नसून, कायदेशीर जबाबदारी स्वीकारण्यासारखे आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हमीपत्र दिल्यानंतरही जर कोणी दोनदा मतदान केल्याचे आढळले, तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
मात्र, या उपाययोजनेवरून नागरिकांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे. “हमीपत्र म्हणजे मूळ जखमेवर लावलेली पट्टी आहे. प्रश्न मतदार यादीतील चुका का दुरुस्त होत नाहीत, हाच आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक जागरूक मतदार देत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसाठी मतदानाच्या दिवशी अशा कागदोपत्री प्रक्रियेमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
PMC Election : पुण्यात सकाळच्या वेळी संथ गतीने मतदान; साडेअकरापर्यंत 14.92 टक्क्यांची नोंद
याबाबत राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदार यादीतील गोंधळ हा प्रशासनाच्या अपयशाचे लक्षण असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, निवडणुकीनंतर संपूर्ण यादीचे शुद्धीकरण आणि पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीचा पाया मजबूत ठेवण्यासाठी मतदार यादी अचूक आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे; अन्यथा “एक नाव, एक मत” ही मूलभूत संकल्पनाच धोक्यात येईल, अशी भावना पुणेकर मतदार व्यक्त करत आहेत.