पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 (फोटो- तेजस भागवत)
पुण्यातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी
सकाळपासूनच पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क
उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
तेजस भागवत/पुणे: आज राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. उद्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज पुणे शहरात देखील नागरिकांनी मतदान करण्याचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पुणेकरांनी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. ‘नवराष्ट्र’ने खास मतदारांशी संवाद साधला.
आज पुणे महापालिकेसाठी सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली आहे. अत्यंत शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मतदानाची स्लिप नागरिकांना सहज मिळावी यासाठी महापालिकेने ठीकठिकाणी केंद्रे उभारली आहेत.
आज मतदान केंद्रावर तरूणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. काही तरुणांनी तर पहिल्यांदा महापालिका निवडणुकीसाठी मतदान केले. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दरम्यान काही मतदान केंद्राबाहेर पार्किंगबाबत नीट सूचना लावल्या नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे यासाठी अनेकांनी आवाहन केले. त्याबाबत पुणेकर नागरिकांनी ‘नवराष्ट्र’शी खास संवाद साधला.

मी महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच मतदान केले आहे. मतदान केल्यावर मला माझे मत मांडण्याची एक जागा मिळाली असे मला वाटते. मतदान करताना आणि केल्यावरचा मजा अनुभव खूप चांगला होता. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे मी सर्वांना आवाहन करेन. जो आपले काम करतोय किंवा आपल्याला आवडत आहे असा उमेदवार निवडून आला तर आपलाच फायदा होऊ शकतो.
– तृषा चैतन्य हेडाऊ, पुणे
लोकशाही बळकट करण्यासाठी या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करतो.
PMC Election : पुण्यात सकाळच्या वेळी संथ गतीने मतदान; साडेअकरापर्यंत 14.92 टक्क्यांची नोंद
– विठ्ठल बराटे, पुणे
आमचे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, तुंबलेले गटारी, नाल्या, पाणीपुरवठ्याचे प्रश्न हे प्रश्न प्रत्यक्षात सोडवणाऱ्या उमेदवारांना मतदान करून आम्ही मोकळे झालो आहोत. केवळ आश्वासनं नाही तर काम करणाऱ्या लोकांनाच संधी देणं गरजेचं आहे.म्हणून मी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला आहे.
— विमल मक्वान, पुणे






