संग्रहित फोटो
पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय तफावत पाहायला मिळत आहे. सर्वाधिक मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना–हॅपी कॉलनी परिसरात नोंदवली गेली आहे. सकाळपासूनच या भागात मतदारांची चांगलीच वर्दळ पाहायला मिळाली. सुशिक्षित मध्यमवर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र होते.
सर्वात कमी मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर–आंबेगाव–कात्रज परिसरात नोंदवली गेली असून, येथे साडेअकरा वाजेपर्यंत केवळ ९.८८ टक्के मतदान झाले आहे. या भागात सकाळी उशिरा सुरू होणारी हालचाल, कामगार वर्गाची उपस्थिती तसेच काही ठिकाणी मतदारांमधील उदासीनता याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
महिला मतदारांच्या सहभागाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. सुस–बाणेर–पाषाण प्रभागामध्ये सर्वाधिक ११ हजार ६५२ महिलांनी साडेअकरा वाजेपर्यंत मतदान केले आहे. विशेष म्हणजे याच प्रभागात पुरुष मतदारांचाही उत्साह दिसून आला असून १६ हजार ३३७ पुरुषांनी मतदान केल्याची नोंद आहे. महिला आणि पुरुष दोन्ही मतदारांचा समतोल सहभाग या प्रभागाची वैशिष्ट्य ठरत आहे.
दुसरीकडे, धनकवडी–कात्रज प्रभागामध्ये महिला मतदारांचा सहभाग सर्वात कमी राहिला आहे. येथे केवळ २ हजार ७८३ महिलांनी मतदान केले असून, पुरुष मतदारांची संख्याही तुलनेने कमी म्हणजेच ३ हजार ८०७ इतकी आहे. या भागात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिका आणि निवडणूक प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, पोलिस बंदोबस्त आणि कर्मचारी वर्ग तैनात असून, मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले महत्वाचे आवाहन
राजकीय पक्षांच्या दृष्टीने दुपारनंतरचा आणि संध्याकाळचा मतदानाचा टप्पा निर्णायक मानला जात आहे. सकाळी कमी टक्केवारी नोंदवली असली, तरी दुपारनंतर आणि कामकाज संपल्यानंतर मतदानाचा वेग वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अखेरचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, हे ठरवताना मतदारांचा सहभाग किती वाढतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






