पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमीन आता सक्तीने भूसंपादन; पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
Purandar News: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असतानाही अद्यापही ४० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आलेले नाही, त्या जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सक्तीने भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मालकांना संमतीपत्रे देणाऱ्या अन्य शेतकऱ्यांप्रमाणे अतिरिक्त सुविधा आणि मोबदला दिला जाणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर विमानतळासाठी , मुंजवडी आणि खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, एखतपूर, पारगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमधील एकूण १,२१६ हेक्टर म्हणजेच सुमारे तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यायासाठी राज्य सरकारकडून प्रतिएकर एक कोटी ६१ लाख रुपये मोबदला जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय या जमिनीवरील झाडे, विहिरी आणि बांधकामांसाठी स्वतंत्र मोबदला देण्याचेही मान्य करण्यात आले होते.
प्रस्तावित गावांतील भूसंपादनासाटी शेतकऱ्यांना संमतीपत्रे देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. या कालावधीत ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली असून त्यांपैकी ७६ टक्के जमीन जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. तर भूसंपादनासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करून देण्यात आला असून , त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये चार हजार कोटी रुपयांचा निधी खात्यात जमा करण्यात आला आहे.
९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंकर प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून उर्वरित ४० हेक्टर जमीन देण्यास पारगाव येथील काही शेतकऱ्यांनी ठाम विरोध दर्शवला आहे.या प्रकरणी प्रकल्पाला विरोध करणासाठी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पण न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.
Climate Change Breaking : २००८ पासून दररोज एक उष्णतेचे वादळ पृथ्वीवर आदळतंय ;नेमकं काय घडतंय ?
जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी संमती देण्यासाठी दोन वेळा मुदत दिली होती. पण त्यानंतरही शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याने आता सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत संबंधित जमिनीच्या मालकांना मालकांना अन्य शेतकऱ्यांप्रमाणे अतिरिक्त सुविधा आणि मोबदला दिला जाणार नाही, असे म्हटले आहे. येत्या काही दिवसांत ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्यात येईल, असही जितेंद्र डुडी यांनी म्हटलं आहे.






