म्हसळा: दोन दिवसांनंतर येत्या 22 तारखेला अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ram Mandir Inauguration) रंगणार आहे. यासाठी देशभरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण असून प्रत्येक भक्त आपल्या पद्धतीने हा दिवस साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर रायगडच्या म्हसळा (Mhasala) तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या शुभम भेकरे (Shubham Bekhre) या तरुण राम भक्ताने श्री रामांना अनोखी वंदना वाहिली आहे. शुभम भेकरे याने कागदावर प्रभू श्रीरामांचे (Prabhu Shree Ram) तब्बल 512 चौरस फुटांचे चित्र रेखाटले आहे. त्याचे हे काढलेले चित्र चर्चेचा विषय ठरले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.
शुभम भेकरे हा दुर्गम डोंगराळ भागातील जांभुळ गावामध्ये राहतो. तब्बल 500 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे प्रभू रामांचे चित्र त्याने रेखाटले. यासाठी 540 कोरे पाने वारण्यात आली असून चारकोलने हे चित्र रेखाटले. चारकोलने 512 चौरस फुटाचे चित्र काढल्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे. कलाकार शुभमचा जन्म गरिब कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे त्याने कोणतेहा प्रोफेशल शिक्षण घेतलेले नाही. तसेच त्याला चित्रकलेची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी देखील नाही. फक्त मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर शुभम कलेबद्दलची माहिती घेत असतो. मोबाईलचा योग्य वापर केल्यास ज्ञानामध्ये भर पाडता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कलाकार शुभम भेकरे आहे. तसेच या प्रभू रामाच्या चारकोलने रेखाटलेल्या चित्राची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होईल अशी आशा चित्रकार शुभम भेकरे याला आहे.
चारकोलच्या माध्यमातून साक्षात प्रभू रामांचे मोहक रुप कागदावर साकारणाऱ्या शुभम भेकरे अगदी 19 वर्षांचा असून त्याने आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण म्हसळा येथे पूर्ण केले. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या शुभमला घराच्या बेताच्या परिस्थितीमुळे कलेमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेता आले नाही. मात्र त्याने आपली कला जोपासत अनेक चित्रं रेखाटली आहेत. त्याची चित्रकला थक्क करणारी असून नयनरम्य अशी आहे. राम भक्त असल्यामुळे श्रीरामांना वंदन करण्यासाठी आपण हे भव्यदिव्य चित्र रेखाटल्याचे त्याने सांगितले. शुभम याने काढलेले श्रीरामाचे चित्र दिवसभर तो गावच्या प्राथमिक शाळेसमोरील पटांगणात ठेवतो संध्याकाळी पुन्हा घरी घेवून जातो. या चित्राची माहिती परिसरातील गावांमध्ये पोहोचल्यानंतर परिसरातील लोक त्याचे हे चित्र पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.