भेरव अंबा नदी पुलावर पाणीच पाणी, नागरिक व वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २५) हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः भेरव गावाजवळील खुरावले फाटा येथून जाणाऱ्या अंबा नदीवरील पुलावरून सकाळपासूनच पाणी वाहत होते, मात्र नागरिक आणि वाहनचालकांनी जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास सुरूच ठेवला.
सकाळी सुमारे १० वाजता या पुलावरून पाणी वाहू लागले आणि काही वेळातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पुलाच्या एका बाजूने पाली व खोपोलीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे, तर दुसऱ्या बाजूने भेरव, वाघोशी, महागाव आणि पेण आदी गावांशी संपर्क साधणारा मार्ग आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने मोठा प्रवासी आणि वाहतूक दबाव निर्माण झाला होता.
पुलावरून पाणी वाहत असतानाही अनेक अतिउत्साही वाहनचालकांनी आपल्या वाहनांना पाण्याच्या प्रवाहातून ओलांडण्याचा प्रयत्न केला. काही दुचाकीस्वार, चारचाकी गाड्यांचे चालक आणि अगदी चालत जाणारे नागरिकदेखील पाण्याच्या प्रवाहाकडे दुर्लक्ष करून पुलावरून पुढे गेले. हे चित्र अत्यंत धोकादायक होते, कारण पाण्याचा प्रवाह अधिक वाढला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती.
स्थानिकांच्या मते, पावसाळ्यात दरवर्षी अंबा नदीला पूर येतो आणि खुरावले फाटा येथील हा पूल दरवेळी पाण्याखाली जातो. या पुलावरून प्रवास करताना प्रवाशांचा जीव धोक्यात येतो, मात्र प्रशासनाकडून कोणतीही तातडीची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत नाही. घटनास्थळी ना पोलीस होते ना होमगार्ड, त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रश्नही निर्माण झाला.
पुलाच्या आजूबाजूला कोणतेही चेतावणी फलक नव्हते, वाहतूक थांबवण्यासाठी कोणतीही अडथळे नव्हते. यामुळेच नागरिकांनी धोकादायक पद्धतीने पाण्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
पालघर जिल्ह्यात रुग्णवाहिका सेवा थांबणार? का आहेत चालक संतत्प? जाणून घ्या
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे काही ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुचवले की, दरवर्षी पूरस्थिती उद्भवत असल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलिस किंवा होमगार्ड तैनात करावेत. वाहतुकीला अटकाव करण्यासाठी तात्पुरते अडथळे उभे करावेत. शिवाय, या पुलाची उंची वाढवून त्याला कायमस्वरूपी सुरक्षित करण्यात यावे, जेणेकरून पावसाळ्यात होणारा त्रास आणि संभाव्य अपघात टाळता येतील.
प्रत्येक वर्षी अशा घटनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत जागरूकता दाखवून रस्ता, पूल आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी आता स्थानिकांमधून उठत आहे.