उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाबाबत आशा वर्कर्सनी महिलांमध्ये जनजागृती करावी, ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवून त्यांचे आरोग्यमान सुधारावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबवले जात आहे. या अभियानामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी होणे आवश्यक असून, यासाठी घरोघरी जाऊन काम करणाऱ्या आशा वर्कर्सनी महिलांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाण्यातील कासारवडवली परिसरातील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रात या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आयुक्त सौरभ राव यांच्यासह उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे, रोटरी क्लबचे अशोक महाजन, डॉ. अनघा कारखानीस तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि आशा वर्कर्स उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आयुक्त राव म्हणाले की, महिलांचे आरोग्य ही केवळ त्यांचीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची आधारशिला आहे. मात्र धकाधकीच्या जीवनात महिलांचे स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्याने वेळेवर तपासणी होणे गरजेचे आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाले, तर त्यावर उपचार शक्य होतो. त्यामुळे झोपडपट्टी आणि कमी संसाधन असलेल्या भागांत विशेष जनजागृतीची गरज आहे.
‘रमी’चा डाव अन् अडकले माणिकराव; बेलगाम मंत्र्यांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? लवकरच फैसला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १९ जुलै रोजी कोरस आरोग्य केंद्र येथे या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरुवातीला केवळ ५० महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु पहिल्याच दिवशी तब्बल २६९ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या यशस्वी प्रतिसादामुळे हे अभियान टप्प्याटप्प्याने ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये राबवण्यात येणार आहे.
अभियानात महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी केली जात असून, गर्भाशय मुखाचा कर्करोग, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी यांसह ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण व आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सल्ला दिला जातो, अशी माहिती डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.
कार्यक्रमानंतर आयुक्त राव यांनी डायलेसिस सेंटर, अतिदक्षता कक्ष व शस्त्रक्रिया विभागाची पाहणी केली. त्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही दिल्या.