फोटो सौजन्य - Mahesh Baldi इंस्टाग्राम
दिपक घऱत/ रायगड: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काळ सुरु झाला आहे. प्रत्येक उमेदवार मतदारसंघ बांधणीचे काम करत आहे. रायगडमधील उरण मतदारसंघातही महेश बालदी यांनी मतदारसंघात प्रचार सुरु केला असून या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगरी समाजाच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागत आहे. तसेच त्यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी ही मागणी ही केली जात आहे.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत, त्या निवडणुकीमध्ये अखिल आगरी समाज परिषद राजकारणापासून अलिप्त आहे असे असताना उरण विधानसभेतील उमेदवार महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत मी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेच्या निवडणूकीला उभा नसून, विधानसभेच्या निवडणूकीला उभा आहे, असे वक्तव्य करून आगरी समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचे वक्तव्य निषेधार्थ असून आगरी समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी. असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे.
अखिल आगरी समाज परिषद ही राजकारण विरहित सामाजिक काम गेले अनेक वर्ष करीत आहे. या परिषदेसाठी कॉ. जि.एल.पाटील, ग. ल. पाटील, वाजेकर शेठ, सोनूभाऊ बसवंत, अॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, व दि.बा.पाटील यांनी फार मोठे योगदान दिले आहे. दि.बा. पाटील यांनी १९८८ ते २०१३ पर्यंत या परिषदेचे समर्थ नेतृत्व केले आहे. त्यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी अखिल आगरी समाज परिषदेच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पूणे आदि जिल्हयातील प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांची सर्व पक्षीय लढा दिला. त्यामुळे या लढयाची दखल घेवून, राज्यसरकारने या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुर केला व तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. लवकरच या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात येईल. असे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री नायडू यांनी सर्व पक्षीय कृती समितीला दिले आहे.
दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात येणार असे असताना महेश बालदी यांनी एका जाहीर सभेत अदानी विमानतळाशी चर्चा केली असल्याचे सांगितले. हे ही त्यांचे वक्तव्य चुकीचे व दि.बा.पाटील यांच्या नावाला विरोध करणारे असल्याचा समज आगरी समाजात पसरली आहे. बालदी यांच्या या वक्तव्यामुळे भूमीपुत्रांच्या अस्मितेला धक्का पोहोचला आहे.या दोन्ही वक्तव्यासंबंधी महेश बालदी यांनी जाहीर माफी मागावी असे अखिल आगरी समाज परिषदेने त्यांना सुचविले आहे.