
भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
मुंबई : भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. भाजपाच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. आता हे प्रकरण येथेच थांबवू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, खजिनदार अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे, ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत, त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, मी तुलना केलेली नाही. इतिहासावर मतभेद असू शकतात मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती. शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. भाजपाने याप्रश्नी अत्यंत हिन पातळीवरचे राजकारण केले, मला धमक्या दिल्या पण अशा धमक्यांना मी घाबरत नाही. भाजपाची पोलखोल करतच राहणार, अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.
आजच्या बैठकीबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे घेऊन मला एका वर्ष झाले, या एका वर्षात मी केलेल्या कामाचा अहवाल आजच्या बैठकीत मांडला, तसेच आगामी वर्ष संघटन बांधणीचे वर्ष म्हणून काम केले जाणार आहे. ग्रामीण भागात मंडल स्तरावर, गावपातळीवर व शहरात वार्ड प्रभाग अध्यक्ष नियुक्त करण्याचे नियोजन आहे. भाजपा सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी शेतकरी, बेरोजगारी, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था सारख्या मुलभूत प्रश्नांवर विविध पद्धतीने आंदोलन करुन सरकारला जाब विचारला जाईल, असेही सपकाळ यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी