आघाडीतील बिघाडीने महायुतीला तारलं? ; पनवेल-उरणमध्ये शेकापच्या उमेदवारांची कडवी झुंज
पनवेल/ दीपक घरत: गेले कित्येक दिवस राज्यात निवडणूकीचे वारे वाहताना दिसत होते. नुकतंच विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर जनतेचा कौल हा महायुतीला असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचपार्श्वभूमीवर पनवेलमध्ये महायुतीची सत्ता आल्याने परिसरात एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. निवडणूकीच्या रिंगणात असताना महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन बरेच अंतर्गत वाद समोर आले याचा फायदा पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना झाला असल्याचं दिसून येत आहे.
राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांनी स्वतंत्रपणे दोन्ही ठिकाणी उतरवलेल्या उमेदवारांच्या मतांची विभागणी झाली. त्यामुळे भाजपाचा विजय सुकर झाल्याचे निकालाअंती आलेल्या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे.वाढीव मालमत्ता कर, रस्त्यावर पडलेले खड्डे, नैना प्रकल्पाविरोधात असलेली नाराजी तसेच मतदार संघात असलेल्या गैरसोयी यांमुळे यंदाची निवडणूक आमदार ठाकूर यांना जड जाईल असे काहीसे चित्र मतदार संघात निर्माण झालं होतं. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत झालेल्या बिघाडीचा फायदा हा महायुतीला सत्ता प्रस्थापित करण्यासाठी झाला आहे.
शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाकडून पनवेल विधानसभा क्षेत्रात लीना गरड या उमेदवार होत्या. वडणुकी पूर्वी आघाडीतील इतर पक्षांच्या जिल्ह्यातील प्रमुखांनी शेकाप सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने काहीशा एकट्या पडलेल्या गरड यांनी जवळपास 43 हजार 989 मत घेतली.
मनसे तर्फे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले योगेश चिले यांनी देखील या पूर्वी मनसे तर्फे निवडणूक लढलेल्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली. या पूर्वी मनसे उमेदवाराला 2009 साली 8 हजार 818 तर 2014 साली 6 हजार 568 मत मिळवण्यात यश आले होते.
उरण विधानसभा मतदार संघात 95 हजार 390 मतं घेत आमदार बालदी यांनी 6 हजार 512 मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला,.तर 88 हजार 878 मतं घेऊन शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हे दुसऱ्या स्थानावर राहिले.त्या खालोखाल सेना उबाठा गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांनी 69 हजार 873 यांनी घेतलेल्या मतांचा आकडा पाहता महाविकास आघाडी म्हणून शेकाप आणि उबाठा गटाच्या उमेदवारांनी एकत्रित आघाडी म्हणून निवडणूक लढवली असती तर उरणमध्ये नक्कीचं वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.
पनवेल विधानसभा क्षेत्रात नोटाला जवळपास 3 हजार 905 मते गेली आहेत. तर उरण विधानसभा क्षेत्रात 2 हजार 653 मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारत नोटाचा पर्याय निवडला.
पनवेल विधानसभा क्षेत्रातील जवळपास 58 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . या पैकी 47.90 टक्के मतदारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना मते दिली. तर बाळाराम पाटील यांच्या पारड्यात 34.60 आणि 11.46 टक्के मतदारांनी लीना गरड यांना मत दिली.उरण विधानसभा क्षेत्रात हीच टक्केवारी आमदार बालदी 36.19 टक्के, शेकाप उमेदवार म्हात्रे 33.72 टक्के तर सेना उमेदवार भोईर 26.52 टक्के इतकी राहिली आहे.विधानसभा निवडणूकीला जनतेने महायुतीसा कौल दिला असून आता राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.