Assembly Election: पेण विधानसभेत भगवा फडकण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हा; अनंत गीते यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षांच्या प्रचार सभेची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या हलालींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. पेण तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते या उपस्थित होते. पेण विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून प्रसाद भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दरम्यान आता पेणमधील सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाकडून शर्तीचे प्रयत्न होत असताना दिसून येत आहेत.
हेही वाचा-‘लाडक्या बहिणींना 1500 नाहीतर 2100 रुपये देणार’; उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना, अनंत गीते म्हणाले की, पेण विधानसभेत भगवा फडकला जावा हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हा. त्यासाठी पेटून उठा. पेण मतदारसंघ भगवामय करायचा आहे. लोकसभा निवडणुकीत पेण मतदारसंघात आपण 47000 मतांनी मागे पडल्याने पराभव झाला. त्याच पेण मध्ये शिवसेनेचा आमदार करायचा आहे. त्याचबरोबर गीते असंही म्हणाले की, शहराबरोबरच ग्रामीण कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्या कार्यकर्त्यांला उठवायचा आहे. विवेकाबरोबर सकारात्मक विचार घराघरात पोहोचले पाहिजे. यासाठी कार्यकर्ता पेटला तर सर्व शक्य आहे. पक्ष प्रमुखांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवुन उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचे आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उध्दव ठाकरे यांच्या कडे आहे. यासाठी जास्तीतजास्त आमदार निवडून आले पाहिजे. त्यासाठी पेण मतदारसंघातील आमदार प्रसाददादा यांच्या रूपाने पाठविण्यासाठी सज्ज व्हा.” असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पेण येथील कार्यकर्ता आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
हेही वाचा-“५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात…”; फडणवीसांनी सांगितला मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्लॅन
यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उमेदवार प्रसाद भोईर, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पेण विधानसभा मतदार संघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, बेरोजगारी व रोजगार उपलब्ध करण्यासाठी नियोजन करणार, खारेपाटातील पाणी टंचाई बाबत आराखडा बनवून सदर प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहोत. गेल्या सहा महिन्यांपासून पेण मतदार संघातील गावोगावी भेटी देऊन लोकांपर्यंत पोहोचलो आहे.आत्ता शिवसेनेची ताकद व ऊर्जा मिळाली आहे. या उर्जेतून आमदार होण्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. सर्व कार्यकर्ते व जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार हा विश्वास आहे.” असे वक्तव्य पेण विधानसभा शिवसेना उमेदवार प्रसाद भोईर यांनी केले.
दरम्यान विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडी यांच्यातील अतीतटीचा सामना पाहता राज्यात कोणाची सत्ता स्थापन होईल ? तसंच कोण मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.