
दरम्यान सावरगाव येथे सुरू असलेल्या माती भरावाच्या कामात संबंधित ठेकेदार कंपनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधपणे उत्खनन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक महसूल प्रशासन या अवैध कामाकडे दुर्लक्ष करत असून, उलट नियमबाह्य कामाला पाठबळ देत असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच जेव्हा स्थानिक नागरिक अवैध वाहतूक पकडून देतात, तेव्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. उलट विचारणा करणाऱ्या नागरिकांवरच दबाव टाकला जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार आणि काही भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने शासनाचा २२ कोटींचा महसूल बुडवला जात असल्याचा दावा किरण ठाकरे यांनी केला आहे.
या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून, बुडवलेला महसूल वसूल करावा आणि या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या ठेकेदार कंपनीसह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किरण ठाकरे यांनी केली आहे. या तक्रारीमुळे कर्जत तालुक्यात गौण खनिज माफिया आणि महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.